विश्वचषक हरल्यानंतरही पुन्हा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती, BCCI चा मोठा निर्णय


वर्ल्ड कप 2023 मधील पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बदलणार की नाही या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयने दिले आहे. बुधवारी एक मोठी घोषणा करत बीसीसीआयने राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदी कायम ठेवले आहे. वर्ल्ड कप फायनलनंतर राहुल द्रविडचा करार संपुष्टात आला होता. राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मणला प्रशिक्षक बनवण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. राहुल द्रविड आता टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे.

राहुल द्रविडने पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, मी बीसीसीआयचा आभारी आहे की त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला. राहुल द्रविड पुढे म्हणाला की, बीसीसीआयने नेहमीच माझ्या योजना आणि दूरदृष्टीला पाठिंबा दिला आहे. राहुल द्रविडने त्याच्या कुटुंबियांचेही आभार मानले ज्यांनी त्याच्यासाठी खूप त्याग केला आहे. राहुल द्रविड म्हणाला की विश्वचषकानंतर त्याच्यासमोर नवीन आव्हाने उभी आहेत आणि त्यांचा सामना करण्यासाठी तो तयार आहे.


बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनीही राहुल द्रविडचे टीम इंडियासोबत असल्याबद्दल आभार मानले आहेत. जय शाह म्हणाले की, द्रविडचा कार्यकाळ आश्चर्यकारक राहिला आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आणि यामध्ये राहुल द्रविडचा मोठा वाटा होता. या कामगिरीमुळेच राहुल द्रविड पुन्हा मुख्य प्रशिक्षक बनण्यास पात्र ठरल्याचे जय शाह म्हणाले. राहुल द्रविडला पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले.

मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा करार किती दिवसांसाठी वाढवण्यात आला, हे स्पष्ट झाले नसले, तरी त्याच्यासमोर मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक, T20 विश्वचषक पुढील वर्षी जूनमध्ये होणार आहे आणि टीम इंडियाचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी पुन्हा एकदा द्रविडवर असेल.