पाकिस्तानमधील लोक अन्नाच्या एक कणासाठी त्रस्त, पीठ 88 टक्के आणि तांदूळ 76 टक्क्यांनी महागले


पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. पाकिस्तानमध्ये खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. शेजारील देशातील महागाई एवढी नियंत्रणाबाहेर गेली आहे की त्यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात शेजारील देशात महागाईचा दर 40 टक्क्यांच्या वर राहिला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील महागाई दर 41.13 टक्के नोंदवला गेला. त्याचवेळी पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने म्हटले आहे की, गॅसच्या वाढत्या किमतींमुळे महागाईत मोठी वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात पाकिस्तानमध्ये गॅसच्या किमती 1,100 रुपयांनी वाढल्या आहेत.

पाकिस्तानमध्ये पिठाच्या किमतीत 88.2 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी बासमती तांदूळ 76.6 टक्के, साधा तांदूळ 62.3 टक्के, याशिवाय चहा पावडर 53 टक्के, लाल तिखट 81.70 टक्के, गूळ 50.8 टक्के, बटाटे 47.9 टक्के महागले आहेत, तर सिगारेट 94 टक्के, गव्हाचे पीठ 88.2 टक्के आणि तिखट 81.7 टक्के महागले आहे.

पाकिस्तानातील अल्पकालीन महागाई गेल्या एका आठवड्यात 10 टक्क्यांनी वाढली आहे. 308.90 च्या तुलनेत तो दर 309.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा आकडा पाकिस्तानातील 17 प्रमुख शहरांतील 50 बाजारांतील 51 जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा समावेश करून तयार करण्यात आला आहे.