आयपीएलमध्ये पुनरागमन करणार राहुल द्रविड, या फ्रँचायझीशी सुरू आहे चर्चा! एका गोष्टीवर अडकली थांबली गाडी


एकदिवसीय विश्वचषकापर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक राहिलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आयपीएलमध्ये पुनरागमन करू शकतो. टीम इंडियासोबत राहुल द्रविडचा करार वर्ल्ड कपपर्यंत होता. यानंतर राहुल टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण अशा बातम्या आल्या आहेत की जर द्रविड टीम इंडियासोबत राहिला नाही, तर काही आयपीएल फ्रँचायझी त्याचा समावेश करू इच्छितात. द्रविडने यापूर्वीही आयपीएलमध्ये प्रशिक्षकपद भूषवले आहे. तो राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) चे मार्गदर्शक राहिला आहे. आता लखनौ सुपर जायंट्स द्रविडला त्यांच्या संघात सामील करू इच्छित असल्याच्या बातम्या येत आहेत.

दैनिक जागरणने आपल्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की द्रविड आणि लखनऊ संघामध्ये चर्चा सुरू आहे. लखनौने 2022 पासून आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. ही फ्रेंचायझी सुमारे दोन वर्षांपासून आहे. या फ्रँचायझीने दोन्ही हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. या काळात गौतम गंभीर संघाचा मार्गदर्शक होता. पण अलीकडेच गंभीरने लखनौ सोडले आणि त्याचा जुना संघ कोलकाता नाईट रायडर्समध्ये परतला.

रिपोर्टनुसार, द्रविड आणि बीसीसीआय यांच्यात काय अंतिम चर्चा होते, यावर सर्व काही अवलंबून आहे. द्रविडचा कार्यकाळ वाढवण्याबाबत किंवा प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करण्याची परवानगी देण्याबाबत बीसीसीआयने काहीही सांगितलेले नाही. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून काहीही समोर आलेले नाही. द्रविड 2021 पासून टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे. त्याला हे पद भूषवायचे नव्हते, पण बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली याने त्याची मनधरणी केली. आता द्रविड यावेळी काय निर्णय घेतो, हे पाहायचे आहे. द्रविड आयपीएलमध्ये परतला, तर त्याच्याकडे वेळ असेल. टीम इंडियासोबत असताना द्रविड खूप व्यस्त राहतो. पण जर तो आयपीएलमध्ये आला, तर त्याला दोन-तीन महिनेच काम करावे लागेल. दैनिक जागरणने आपल्या वृत्तात सांगितले की, राजस्थान रॉयल्सनेही द्रविडला त्यांचा मेंटर बनण्याची ऑफर दिली आहे.

द्रविडच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली, पण विजेतेपद मिळवू शकली नाही. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे, पण द्रविड संघासोबत नाही, कारण त्याचा कार्यकाळ संपला आहे. सध्या एनसीएचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. द्रविडने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवला नाही, तर ही जबाबदारी लक्ष्मण यांच्यावर सोपवली जाऊ शकते, असे मानले जात आहे.