‘आम्हाला राजेशाही हवी आहे, प्रजासत्ताक नाही’, नेपाळमध्ये पुन्हा का केली जात आहे हिंदु राष्ट्राची मागणी?


नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदू राष्ट्राची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. यासाठी राजधानी काठमांडूमध्ये गुरुवारी प्रचंड निदर्शने झाली. परिस्थिती एवढी नियंत्रणाबाहेर गेली की जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला, यात पोलीस आणि आंदोलक दोघेही किरकोळ जखमी झाले.

2008 मध्ये संपुष्टात आलेली राजेशाही परत यावी आणि नेपाळचा हिंदू राष्ट्र म्हणून दर्जा बहाल करावा, या मागणीसाठी हजारो आंदोलक एकत्र आले. यामध्ये मोठ्या संख्येने नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. निदर्शनादरम्यान ते सतत ज्ञानेंद्र यांच्या बाजूने घोषणा देत होते. आपल्यासाठी जीवापेक्षा राजा महत्त्वाचा असून आपल्याला प्रजासत्ताक नव्हे, तर राजेशाही हवी आहे, असे ते म्हणाले.

आंदोलकांचा आरोप आहे की नेपाळचे सरकार, राजकीय पक्ष आणि संपूर्ण प्रशासकीय कर्मचारी भ्रष्ट झाले आहेत. त्यामुळेच ही अयशस्वी शासन व्यवस्था समूळ उखडून टाकण्याची गरज आहे, असेही त्यांचे मत आहे.

काळ किती बदलला आहे, आपण पाहू शकता की, 2006 मध्ये हेच राजा ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह देव सत्तेवर असताना त्यांच्या विरोधात अनेक आठवडे रस्त्यावर प्रचंड निदर्शने झाली. तत्कालीन राजा ज्ञानेंद्र यांना त्यांच्या राजवटीचा त्याग करून लोकशाही लागू करण्यास भाग पाडले गेले. दोन वर्षांनंतर, नवनिर्वाचित संसदेने राजेशाही रद्द करण्यासाठी मतदान केले आणि नेपाळला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.

प्रजासत्ताकाचा अर्थ असा होता की देशाचा प्रमुख राष्ट्रपती असेल, राजा नाही. पुढे नेपाळला हिंदू राष्ट्राऐवजी धर्मनिरपेक्ष घोषित करण्यात आले. हे अंतरिम संविधानाच्या मदतीने केले गेले.