ओसरली सलमान खानच्या टायगर 3 ची क्रेझ! 12 व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला


सलमान खानचा टायगर 3 हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने केवळ भारतात 44.5 कोटी रुपये कमवले. मात्र, आता या चित्रपटाची क्रेझ कमी झाल्याचे दिसून येत आहे, कारण बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे सातत्याने घसरत आहेत. रिलीजच्या 12व्या दिवशी हा चित्रपट 5 कोटींची कमाई करू शकला नाही.

sacnilk च्या रिपोर्टनुसार, 12 व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चित्रपटाने अंदाजे 4.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे आकडे भारतीय बॉक्स ऑफिसचे आहेत. या चित्रपटात सलमानच्या सोबत कतरिना कैफ दिसली असून इमरान हाश्मीने मुख्य खलनायकाची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाच्या आत्तापर्यंतच्या एकूण कमाईबद्दल बोलायचे झाले, तर 12व्या दिवसाच्या कलेक्शनसह हा चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. रिपोर्टनुसार, टायगर 3 ने 12 दिवसांत भारतात एकूण 254.46 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ज्या वेगाने ओपनिंग केली, त्यानंतर हा चित्रपट बंपर कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात होता. दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे वाटत होते. मात्र, आता तसे होताना दिसत नाही.

हा चित्रपट YRF प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला आहे आणि स्पाय युनिव्हर्स फ्रँचायझीचा भाग आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खूप पैसा खर्च केला आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट 350 कोटींहून अधिक आहे. यासह, YRF spy universe मधील हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. कारण या आधी प्रदर्शित झालेल्या या स्पायच्या चार चित्रपटांचे बजेट यापेक्षा कमी होते. ते चार चित्रपट म्हणजे एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण.