विराट कोहलीच्या नितीमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या व्यक्तीला पाकिस्तानने बनवले प्रशिक्षक, त्याच्यावर घालण्यात आली होती बंदी


पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. एकदिवसीय विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कठोर निर्णय घेत संपूर्ण निवड समिती बरखास्त केली. यानंतर पीसीबीने बाबर आझमवर मोठा निर्णय घेण्याचे मन बनवले होते, या पार्श्‍वभूमीवर बाबरने स्वतः तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला. T20 आणि कसोटीच्या नवीन कर्णधारांची घोषणा करताना PCB ने संपूर्ण प्रशिक्षक कर्मचारी NCA मध्ये हलवले आणि आता बोर्डाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध असलेला माजी कर्णधार मोहम्मद हाफीज याची पीसीबीने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. याच हाफिजने विराट कोहलीच्या नितीमत्तेवर प्रश्न उपस्थित केले होते.

हाफिजपूर्वी ग्रँट ब्रॅडबर्न यांनी पाकिस्तान संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती, मात्र त्यांच्या कार्यकाळात आशिया चषक आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. यानंतर पीसीबीने त्याला संपूर्ण स्टाफसह एनसीएमध्ये हलवले आहे आणि आता हाफिजला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.

पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांनी हाफिजवर अधिक विश्वास व्यक्त करत त्याच्यावर दुहेरी जबाबदारी सोपवली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात संघाचे प्रशिक्षक असण्यासोबतच हाफिजची पीसीबीने संघ संचालक म्हणूनही नियुक्ती केली आहे. हाफिजपूर्वी ही जबाबदारी मिकी आर्थरवर होती. आर्थर आता उर्वरित कोचिंग स्टाफसोबत एनसीएमध्ये दिसणार आहे. पाकिस्तानला ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका आणि न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. हा संघ डिसेंबर आणि जानेवारीमध्ये हा दौरा करणार आहे. मात्र हाफिजला कोचिंगचा अनुभव नाही. पीसीबीने शान मसूदला कसोटी संघाचे कर्णधार बनवले आहे, तर टी-20 संघाचे कर्णधारपद शाहीन शाह आफ्रिदीकडे सोपवले आहे. पीसीबीने अद्याप वनडे संघाच्या कर्णधाराची घोषणा केलेली नाही.

हाफिज हाच तो व्यक्ती आहे ज्याने विराट कोहलीच्या नितीमत्तेवर प्रश्न उपस्थित केले होते. जेव्हा कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरच्या 49 एकदिवसीय शतकांची बरोबरी केली, तेव्हा हाफिजने कोहलीच्या खेळीला स्वार्थी म्हटले होते आणि म्हटले की, शतकाजवळ पोहचल्यानंतर कोहलीने हळू फलंदाजी करण्यास सुरुवात केली, जेणेकरून तो आपले शतक पूर्ण करू शकेल. हाफिज हा अष्टपैलू खेळाडू होता, जो दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला होता. तो चांगला फलंदाज होता आणि ऑफ-स्पिनही करायचा, पण त्याच्या गोलंदाजीवरही बंदी घालण्यात आली होती. आयसीसीला हाफिजची गोलंदाजी अॅक्शन संशयास्पद वाटली आणि त्याच्यावर बंदी घातली होती.