IND vs NED : टीम इंडियाला करावे लागतील हे बदल, अन्यथा उपांत्य फेरीत होऊ शकते मोठे नुकसान


विश्वचषक 2023 च्या 44 सामन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर उपांत्य फेरीतील 4 संघांचा फैसला झाला आहे. सलग 8 सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाने प्रथम उपांत्य फेरीत धडक मारली, त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाही पोहोचले. आता न्यूझीलंडनेही आपले नाव अधिकृतपणे नोंदवले आहे. आता पुन्हा एकदा टीम इंडियाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करावा लागणार हा विचित्र योगायोग आहे. या सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडियाला शेवटची संधी आहे, ती म्हणजे नेदरलँड्सविरुद्धचा सामना. टीम इंडिया हा सामना आज म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये खेळणार असून यामध्ये टीम इंडियाला काही खास बदल करावे लागतील.

टीम इंडियाने विश्वचषकातील प्रत्येक सामन्यात सातत्याने चांगली कामगिरी केली. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल यांनी फलंदाजीत सर्वाधिक योगदान दिले आहे. सर्व गोलंदाजांनी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करत संघाला सलग 8 विजय मिळवून दिले आहेत. आता नेदरलँड्सविरुद्धचा सामना ही केवळ औपचारिकता आहे. दिवाळी असल्याने या सामन्याकडे कमी लोकांचे लक्ष असू शकते, परंतु टीम इंडियाला या सामन्यात काही खास गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येक खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी पूर्णपणे तयार असेल.

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने या स्पर्धेत आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे. शुभमन गिलला मोठी खेळी खेळता आली नसली, तरी चांगली सुरुवात करून देण्यात त्यानेही योगदान दिले आहे. यादरम्यान श्रेयस अय्यर आणि राहुल यांनीही चांगली साथ दिली आहे. रोहित आणि विराटचा फॉर्म चांगला आहे. फलंदाजीत सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा ही दोनच नावे आहेत, ज्यांनी भरपूर चेंडूंचा सामना केला नाही.

या दोघांचीही फिनिशरची भूमिका असली तरी 2019 च्या उपांत्य फेरीत जे घडले, ते लक्षात घेता टीम इंडियाला आपल्या खालच्या-मध्यम क्रमवारीलाही अशा परिस्थितीसाठी तयार ठेवायला आवडेल. आतापर्यंत सूर्याने 4 डावात केवळ 74 चेंडूंचा सामना केला आहे, तर जडेजाने 96 चेंडू खेळले आहेत. अशा स्थितीत नेदरलँडविरुद्ध या दोघांनाही चौथ्या आणि पाचव्या स्थानावर बढती मिळाली, तर दोघेही लांब डाव खेळू शकतील.

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर टीम इंडियाला या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारख्या गोलंदाजांना विश्रांती देण्याची संधी आहे, परंतु बुमराहला विश्रांती देणे हा एक चांगला पर्याय आहे. असे असले तरी, शमीने फक्त 4 सामने खेळले आहेत आणि फक्त 26 षटके टाकली आहेत. अशा परिस्थितीत त्याला कायम ठेवता येईल. युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला आजमावण्याची यापेक्षा चांगली संधी संघ व्यवस्थापनाला नसेल. दुर्दैवाने उपांत्य फेरीपूर्वी दुखापतीमुळे कोणत्याही वेगवान गोलंदाजाला बाहेर बसावे लागले, तर प्रसिद्धला किमान सामन्याचा सराव असेल. त्याच्याशिवाय अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही मैदानात उतरवले जाऊ शकते. अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त पहिलाच सामना खेळला होता आणि तेव्हापासून तो बेंचवर आहे.