World Cup : प्रशिक्षक द्रविडकडून रोहितचे जोरदार कौतुक, म्हणाला- इतरांसमोर ठेवले उदाहरण


टीम इंडिया रविवारी विश्वचषक-2023 च्या साखळी टप्प्यातील शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना बेंगळुरू येथे होणार आहे. टीम इंडिया आधीच उपांत्य फेरीत पोहोचली असून या सामन्याचा पॉइंट टेबलवर कोणताही परिणाम होणार नाही. टीम इंडिया जिंकली किंवा हरली, तरी अव्वल स्थानावर राहील. त्यांचे 16 गुण आहेत. टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले.

राहुल द्रविड म्हणाला की रोहित शर्माने संघाचा कर्णधार आणि सलामीवीर या दुहेरी भूमिकेत चमकदारपणे जुळवून घेऊन भारताच्या आठ सामन्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय संघाचे शानदार नेतृत्व करण्यासोबतच रोहित शर्माने सलामीवीर म्हणूनही आपल्या संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. रोहितने 8 सामन्यात 443 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 122 आहे.

द्रविड म्हणाला की, रोहित नक्कीच एक लीडर आहे. मला वाटते की त्याने मैदानावर आणि मैदानाबाहेरही एक उदाहरण ठेवले आहे. तो म्हणाला की असे काही सामने झाले आहेत, जे आमच्यासाठी अवघड असू शकतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आम्हाला अशा प्रकारची सुरुवात देण्यात तो यशस्वी झाला आहे, ज्यामुळे आमच्यासाठी सामने चांगले झाले.

तो पुढे म्हणाला की यामुळे सामना आमच्यासाठी सोपा झाला आणि फलंदाजी विभागात त्याच्यानंतर आलेल्या खेळाडूंसाठी नक्कीच सोपे झाले. द्रविड म्हणाला, रोहितने संघाच्या गरजेनुसार खेळून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे आणि याचा भारतीय ड्रेसिंग रूमवर मोठा परिणाम झाला आहे.

द्रविड म्हणाला, आम्ही एका विशिष्ट पद्धतीने खेळण्याविषयी बोलतो. जोपर्यंत तुमचा लीडर तसे करत नाही आणि तुमच्यासाठी उदाहरण सेट करत नाही, तोपर्यंत तुम्ही ते करू शकत नाही. रोहितने ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, ती अप्रतिम आहे. मला वाटते की त्याचे कर्णधारपद उत्कृष्ट आहे. तो असा खेळाडू आहे, ज्याला खेळाडू आणि कोचिंग स्टाफकडून नक्कीच खूप आदर मिळतो.