पुनरागमनासाठी सज्ज असलेला ऋषभ पंत होणार कर्णधार, या दिग्गज खेळाडूने केले जाहीर


भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात जखमी झाला होता. याच कारणामुळे तो बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियापासून दूर होता. त्याने आयपीएल-2023 मध्ये भाग घेतला नाही. त्याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही खेळला नाही. या दुखापतीमुळे तो 2023 च्या वर्ल्ड कपपासून दूर राहिला. पण आता पंत तंदुरुस्त होऊन पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. पंत लवकरच क्रिकेटच्या मैदानात परतताना दिसणार आहे. पंत नुकताच कोलकाता येथे त्याच्या आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरात सहभागी झाला होता. मात्र, त्याने सराव केला नाही. दरम्यान, दिल्लीचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी पंतबाबत एक मोठे अपडेट दिले आहे.

गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी पंत दिल्लीहून आपल्या घरी जात असताना त्याच्या कारला अपघात झाला. दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार उलटली, त्यात पंत जखमी झाला. या अपघातात पंतला लिगामेंटचा त्रास झाला आणि त्यासाठी त्याचे ऑपरेशन झाले. शस्त्रक्रियेनंतर पंतची प्रकृती आता चांगली आहे.

गांगुलीने पंतच्या फिटनेसबाबत एक मोठा अपडेट दिले आहे. पंत चांगल्या स्थितीत असल्याचे गांगुली म्हणाला. पंत पुढील हंगामात आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे गांगुलीने स्पष्ट केले आहे. एवढेच नाही, तर पंत दिल्ली कॅपिटल्समध्ये कर्णधार म्हणून परतणार असल्याचेही गांगुलीने स्पष्ट केले आहे. गांगुली म्हणाला की पंत चांगल्या स्थितीत आहे, पण त्याने शिबिरात सराव केला नाही. तो 11 नोव्हेंबरपर्यंत येथे असणार आहे. पंत हा संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे त्याच्याशी संघाची चर्चा झाली, असे गांगुलीने सांगितले. आगामी लिलावासंदर्भात ही चर्चा झाल्याचे गांगुली यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पंतच्या संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये तो भारताच्या स्थानिक वनडे स्पर्धेत विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पुढील वर्षी जानेवारीत अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत पंत टीम इंडियात परतणार असल्याचे या अहवालांमध्ये सांगण्यात आले होते.