Diwali 2023 : धनत्रयोदशी, दिवाळी ते भाऊबीज… या पाच दिवसांच्या उत्सवाची काय आहे पौराणिक कथा ?


दिवाळीचा सण 5 दिवस चालतो, जो धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेच्या दिवशी संपतो. भारतीय काळाची गणना सत्ययुगापासून सुरू होते असे म्हणतात. या काळात पहिल्यांदाच दिवाळी सण साजरा करण्यात आला. यानंतर त्रेता आणि द्वापर युगात राम आणि कृष्णाबरोबरच त्यात नवीन घटनांची भर पडली आणि तो पाच दिवसांचा उत्सव बनला.

सध्या देशभरात दिवाळीची धूम सुरू आहे. दिवाळी हा आनंद साजरा करण्याचा आणि वाटून घेण्याचा सण आहे. 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आणि ओळख आहे. हा पाच दिवस चालणारा उत्सव देवी लक्ष्मी, भगवान राम आणि कृष्णाच्या पूजेला समर्पित आहे.

पाच दिवसांचे महत्त्व?
पाच दिवसांच्या या सणात दिवाळी सर्वात खास आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवसापासून खरेदी सुरू होते आणि हा सण यम द्वितीयेला संपतो. या पाच दिवसांमध्ये सर्वत्र भक्ती आणि आनंदाचे वातावरण असते आणि त्याची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांच्या उत्सवाची तारीख आणि या सर्व दिवसांचे महत्त्व जाणून घेऊया.

पहिला दिवस (धनत्रयोदशी)
सर्वप्रथम, सत्ययुगात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी प्रकट झाले. तेव्हापासून धनत्रयोदशीचा सण सुरू झाला. धनत्रयोदशीला अमृतपत्राचे स्मरण करून नवीन भांडी व नवीन वस्तू घरी आणण्याची परंपरा आहे. या दिवशी दिवे दान केल्याने यमराज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अशीही श्रद्धा आहे. यावर्षी हा सण 10 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

दुसरा दिवस (नरक चतुर्दशी)
द्वापर यगुमध्ये या कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तेव्हापासून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरक चतुर्दशीच्या दिवशी पाच-सात दिवे लावण्याचीही परंपरा आहे. यावेळी हा सण 11 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

तिसरा दिवस (दिवाळी)
सत्ययुगात, देवी लक्ष्मी प्रथम कार्तिक महिन्याच्या अमावस्येला समुद्रमंथनातून प्रकट झाली. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा आहे. तेव्हापासून दिवाळी साजरी सुरू झाली. पुढे त्रेतायुगातील या दिवशी राम वनवासातून घरी परतले. हा दिवस महालक्ष्मीच्या पूजेसाठी खास आहे. यावर्षी 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे.

चौथा दिवस (गोवर्धन पूजा)
द्वापर युगात भगवान श्रीकृष्ण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला गोवर्धन पर्वताची पूजा करत असत. तेव्हापासून हा दिवस या पाच दिवसांच्या उत्सवाचा एक भाग बनला. या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ तयार करून देवाला दूध, दही, तूप अर्पण केले जाते. तसेच, विकास आणि वाढीसाठी दिवे लावले जातात. यावर्षी हा उत्सव 13 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

पाचवा दिवस (भाऊबीज)
द्वापार युगात या दिवशी नरकासुराचा पराभव करून कृष्ण आपली बहीण सुभद्राला भेटायला गेले होते. तर सत्ययुगात याच दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी तिच्या आमंत्रणावर गेले होते आणि यमुनाजींनी त्यांना टिळा लावून त्यांचा सन्मान केला होता. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भाऊ-बहिणीतील प्रेमाचे बंध दृढ करण्याचा दिवस आहे. यंदा 14 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होणार आहे.