Glenn Maxwell : अप्रतिम, अविश्वसनीय, अकल्पनीय… पाहिली नसेल अशी खेळी, मॅक्सवेलने रचला इतिहास


ग्लेन मॅक्सवेलने मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आपल्या बॅटने वादळ निर्माण केले आणि अफगाणिस्तानकडून विजय हिसकावून घेत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. अफगाणिस्तानने दिलेल्या 292 धावांच्या लक्ष्यासमोर ऑस्ट्रेलियाने केवळ 49 धावांत आपले पाच विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर मॅक्सवेलने जबाबदारी स्वीकारली आणि लंगडत द्विशतक झळकावून ऑस्ट्रेलियाला तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. त्याने पॅट कमिन्ससोबत 202 धावांची भागीदारी केली, त्यातील 179 धावा एकट्या मॅक्सवेलच्या होत्या. मॅक्सवेलने 201 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्यात त्याने 128 चेंडूंचा सामना केला आणि 21 चौकार आणि 10 षटकार ठोकले.

मॅक्सवेलची ही खेळी वनडे इतिहासातील सर्वात शानदार खेळी आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये अशी खेळी कोणत्याही फलंदाजाने खेळली नाही, जिथे त्याने एकट्याने संघाला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि संघाला विजयापर्यंत नेले. मॅक्सवेल त्याच्या वादळी शैलीसाठी ओळखला जातो आणि त्याने अनेक वेळा अपयशी झाल्यानंतरही संघ त्याच्यावर विश्वास का ठेवतो आणि त्याला सतत संधी का देतो हे सांगितले.

अफगाणिस्तानने दिलेल्या 292 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सुरूवातीला झटके सहन करावे लागले. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, मार्नस लॅबुशेन, ट्रॅव्हिस हेड आणि जोस इंग्लिस हे 49 धावा पूर्ण होईपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. इथून अफगाणिस्तान आणखी एक मोठा अपसेट काढेल असे वाटत होते, पण मॅक्सवेलने पुन्हा आपले पाय रोवले. दरम्यान, 22 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुजीब उर रहमानने मॅक्सवेलचा झेल सोडला, तेव्हा त्यालाही जीवदान मिळाले. याचा फायदा घेत मॅक्सवेलने झंझावाती पद्धतीने धावा केल्या. त्याने 76 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, परंतु त्यानंतर त्याच्या पायात गोळे आले. फिजिओला दोनदा मैदानात यावे लागले, पण मॅक्सवेलला ते मान्य नव्हते. त्याला नीट उभे राहता येत नव्हते, पण त्याची बॅट चांगलीच स्विंग होत होती. यासह मॅक्सवेल एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

या खेळीने मॅक्सवेलने केवळ आपल्या नावावर विक्रमच नोंदवला नाही, तर आपल्या संघाचे नावही रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. ऑस्ट्रेलियाचा हा विजय वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील लक्ष्याचा पाठलाग करताना कोणत्याही संघाने मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. विश्वचषकात यापेक्षा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कोणीही केला नव्हता. या सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये मॅक्सवेलने जोरदार फटकेबाजी करत आपले द्विशतक पूर्ण केले. संघाला विजयासाठी 25 धावांची गरज असताना मॅक्सवेलला दुहेरी शतक पूर्ण करण्यासाठी 23 धावांची गरज होती. मॅक्सवेलने एकट्याने या धावा केल्या आणि संघाला विजयापर्यंत नेले.