Online Fraud: फसवणूक करणारे या 3 मार्गांनी लावू शकतात तुम्हाला चुना, अशा प्रकारे करा संरक्षण


ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, आपण सर्वजण कधी ना कधी अशा चुका करतो, ज्या नंतर आपल्याला महागात पडतात. हॅकर्स किंवा फसवणूक करणारे तुमचे कष्टाचे पैसे कसे चोरतात, ते आम्ही तुम्हाला सांगतो. आज आम्ही तुम्हाला असे तीन प्रकार सांगणार आहोत, ज्याचा वापर फसवणूक करणारे लोक लुटण्यासाठी करतात.

चला जाणून घेऊया या कोणत्या युक्त्या आहेत, ज्यापासून तुम्ही स्वतःचे संरक्षण केले पाहिजे. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुम्ही स्वत:ला आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकता, परंतु नुकसान टाळण्यासाठी स्वत:ला नेहमी अलर्ट मोडवर ठेवा.

OTP फसवणूक
ओटीपी म्हणजेच वन-टाइम पासवर्ड, ओटीपीशी संबंधित फसवणूकही वेगाने वाढत आहे. लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवून, घोटाळेबाज वापरकर्त्यांकडून OTP घेतात आणि नंतर बँक खाते रिकामे करण्यासाठी OTP वापरतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फोनवर आलेला OTP कोणाशीही शेअर करू नका, चुकूनही असे केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

केवायसी अपडेटच्या नावाखाली फसवणूक
फसवणूक करणारे अनेकदा फोन करून लोकांना सांगतात की ते बँकेतून फोन करत आहेत. फसवणूक करणारे लोकांना घाबरवून त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की तुमचे केवायसी अपडेट झाले नाही. केवायसी अपडेटच्या बहाण्याने फसवणूक करणारे तुमची वैयक्तिक माहिती घेतात आणि तुमचे बँक खाते रिकामे करतात.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला बँकेकडून कधीही कॉल येणार नाही, जरी कॉल आला तरी बँकेत काम करणारा कोणताही अधिकारी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती जसे की खाते तपशील इत्यादी विचारणार नाही.

वीज बिलाच्या नावाखाली सुरू आहे फसवणूक
आत्तापर्यंत अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत, ज्यात लोकांना असे मेसेज मिळतात की बिल न भरल्याने त्यांची वीज खंडित होईल. जर तुम्हाला कनेक्शन तोडणे टाळायचे असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तर अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही अनोळखी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नका, कारण तुमची एक चूक महागात पडू शकते आणि तुमचे बँक खाते रिकामे होईल.