World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये पुन्हा होणार का भारत आणि पाकिस्तान सामना?, जाणून घ्या काय आहे समीकरण


भारतीय क्रिकेट संघाने रविवारी शानदार खेळाचे प्रदर्शन करत एकदिवसीय विश्वचषकात विजयी मालिका सुरू ठेवली आहे. आधीच उपांत्य फेरीत पोहोचलेल्या या संघाने कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यासह भारताने लीग टप्पा पहिल्या स्थानावर संपेल याची खात्री केली आहे. दक्षिण आफ्रिकेनेही उपांत्य फेरीत धडक मारली आहे, मात्र उर्वरित दोन संघांबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अशा स्थितीत उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी होणार हा प्रश्न सर्वांच्या मनात असेल.

आठ सामन्यांत आठ विजयांसह भारताचे 16 गुण आहेत. इतर कोणताही संघ त्याची बरोबरी करू शकत नाही, त्यामुळे टीम इंडिया नंबर-1 राहील. त्यातच भारताला 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. आठ सामन्यांत सहा विजय आणि दोन पराभवांसह दक्षिण आफ्रिकेचे 12 गुण आहेत. त्यांचा अफगाणिस्तानविरुद्धचा एक सामना बाकी आहे आणि जर हा संघ त्यात जिंकला, तर दुसरे स्थान जवळपास निश्चित होईल.

ऑस्ट्रेलिया सध्या सात सामन्यांत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाला अजून दोन सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्धचे दोन्ही सामने जिंकल्यास त्यांचेही 14 गुण होतील. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी लढत होईल, ज्यात ज्या संघाचा नेट रनरेट चांगला असेल तोच विजयी होईल. असे पाहिले, तर हे दोन संघ दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहणार हे जवळपास निश्चित आहे. पण टीम इंडिया दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांशी संबंधित नाही, कारण उपांत्य फेरीचा सामना पहिल्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये होईल, तर दुसरा उपांत्य सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये होईल. सध्या न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे, पण पाकिस्तानही येथे पोहचू शकतो.

न्यूझीलंड सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवानंतर त्यांच्या खात्यात आठ गुण आहेत. पाकिस्तानचीही तीच अवस्था आहे. चार सामन्यांत चार विजय मिळवून त्यांचेही आठ गुण आहेत, पण चांगल्या धावगतीमुळे न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडला आपला पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. तर पाकिस्तानला आपला पुढचा सामना इंग्लंडसोबत खेळायचा आहे. जर दोन्ही संघांनी हा सामना जिंकला, तर चौथ्या स्थानाच्या शर्यतीत ते असतील आणि नंतर प्रकरण नेट रनरेटवर अडकेल. सध्या न्यूझीलंडचा रन रेट चांगला आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होण्याची दाट शक्यता आहे. याचे एक कारण म्हणजे न्यूझीलंडला आपला पुढचा सामना मजबूत स्थितीत नसलेल्या श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला हरवण्याची ताकद असलेल्या इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे.

पण जर न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेकडून हरला आणि पाकिस्तानचा संघ इंग्लंडविरुद्ध जिंकला, तर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर असेल आणि त्यानंतर भारत-पाकिस्तान उपांत्य सामना पाहायला मिळेल. मात्र, या शर्यतीत अफगाणिस्तानकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांचे सात सामन्यांतून चार विजय आणि तीन पराभवांसह आठ गुण आहेत. त्याला पुढील दोन सामने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत. अफगाणिस्तान संघाने या विश्वचषकात दमदार कामगिरी करून पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका या संघांना पराभूत केले आहे. अशा स्थितीत जर त्याने आपले दोन्ही सामने जिंकले आणि न्यूझीलंड आणि पाकिस्तानने आपले सामने गमावले तर भारत उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा सामना करू शकतो. दुसरीकडे, पाकिस्तान आणि न्यूझीलंडने आपले सामने जिंकले आणि अफगाणिस्ताननेही विजय मिळवला, तर प्रकरण नेट रनरेटवर अडकेल. ज्याचा नेट रनरेट चांगला असेल तो चौथ्या क्रमांकावर असेल आणि भारताशी स्पर्धा करेल.