अंबानींच्या अँटिलियाबद्दल तुम्हाला माहिती आहे, पण अदानींच्या घराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?


केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक असलेल्या अँटिलियाबद्दल तुम्हा सर्वांना काही माहिती असेलच. त्याबाबतच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. हे घर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे आहे, जे दक्षिण मुंबई परिसरात आहे. पण देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या घराबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? त्यांचे घर कुठे आहे माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया…

गौतम अदानी सहसा अहमदाबाद, गुजरातमध्ये आपला बहुतेक वेळ घालवतात. गुजरातची राजधानी गांधीनगरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अहमदाबादमध्ये अदानी समूहाचे मुख्यालयही आहे आणि ‘अदानी हाऊस’ही त्याच शहरात आहे. याशिवाय काही वर्षांपूर्वी गौतम अदानी यांनी दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये एक बंगलाही खरेदी केला होता. सफदरजंग एन्क्लेव्हमध्ये अदानी ग्रुपचे गेस्ट हाऊसही आहे.

अहमदाबादमध्ये असलेले गौतम अदानी यांचे ‘अदानी हाऊस’ शहरातील नवरंगपुरा भागात आहे. हे मीठकाली सर्कल जवळ आहे. अदानीचे हे घर शहराच्या अत्यंत वर्दळीच्या भागात असले, तरी जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ पोहोचाल, तेव्हा तुम्हाला हा परिसर एकदम शांत दिसेल. या घरासाठी बरीच मोकळी जागा सोडण्यात आली आहे. गौतम अदानी यांचेही या घरात वैयक्तिक कार्यालय आहे. येथे ते पत्नी प्रीती अदानी आणि मुलांसह राहतात.

गौतम अदानींच्या या घराची खरी किंमत किती आहे, याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाल्यास, अहमदाबादच्या या भागात प्रॉपर्टीची किंमत 5300 ते 7500 रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. गौतम अदानी यांच्या घराचा आकार बघितला, तर ती अनेक कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

काही काळापूर्वी गौतम अदानी यांनीही दिल्लीच्या लुटियन्स झोनमध्ये बंगला खरेदी केला होता. हे 3.4 एकरमध्ये पसरलेले आहे, त्याचे बिल्ट-अप क्षेत्र 25,000 चौरस फूट आहे. गौतम अदानी यांच्या आधी या बंगल्याची मालकी आदित्य इस्टेट्सकडे होती. नोटबंदीनंतर NCLT कारवाईद्वारे अदानी यांना 400 कोटी रुपयात हा बंगला मिळाला. त्याची किंमत 265 कोटी रुपये होती, तर त्याला लीज-होल्डवरून फ्री-होल्ड मालमत्तेत रूपांतरित करण्यासाठी 135 कोटी रुपये द्यावे लागले. सर्वोच्च न्यायालयाजवळ भगवान दास रोडवर त्यांचा बंगला आहे.