ऑनलाइन केली मिल्कशेकची ऑर्डर, पाठवली युरिन, डिलिव्हरी बॉयने सांगितली धक्कादायक गोष्ट


सहसा, जेव्हा तुम्ही फूड डिलिव्हरी अॅपवरून एखादी वस्तू ऑर्डर करता, तेव्हा तीच गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचते. मात्र मिल्कशेकऐवजी लघवीने भरलेला बंद डबा देण्यात आल्याने एका व्यक्तीला धक्का बसला आहे. मिल्कशेकचा घोट घेतल्यावर त्या माणसाच्या हे लक्षात आले. हे धक्कादायक प्रकरण अमेरिकेतील उटाह येथील आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

फॉक्स 59 मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, उटाहच्या कॅलेब वुड्सने ग्रबहब फूड डिलिव्हरी अॅपद्वारे चिक-फिल-ए रेस्टॉरंटमधून फ्राईज् आणि मिल्कशेकची ऑर्डर केली. पण मिल्कशेकचा घोट घेताच त्याने लघवी प्यायल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्या व्यक्तिने वृत्तवाहिनीला सांगितले की आपण आपल्या ऑर्डरची आतुरतेने वाट पाहत होतो. त्यामुळे डिलिव्हरीनंतर तो स्वत:वर नियंत्रण ठेवू शकला नाही. वुड्स म्हणाला, मी लगेच फ्राईज खायला सुरुवात केली. पण जेव्हा मी मिल्कशेकमध्ये स्ट्रॉ टाकली आणि एक घोट घेतला, तेव्हा मला समजले की मी जे पिऊन मिल्कशेक नाही, तर लघवी होती. यामुळे संतापलेल्या वुड्सने तात्काळ डिलिव्हरी बॉयला फोन केला. पण रायडरने त्याला जे सांगितले ते त्याहूनही धक्कादायक होते.

वूड्सने दावा केला आहे की डिलिव्हरी बॉयने त्याच्या कारमध्ये ठेवलेले दोन स्टायरोफोम कप संदर्भात गोंधळ झाल्याचे मान्य केले. डिलिव्हरी बॉयने सांगितले की तो बराच वेळ काम केल्यामुळे बाथरूममध्ये ब्रेक घेऊ शकत नव्हता. अशा परिस्थितीत, तो नेहमी त्याच्या कारमध्ये एक डिस्पोजेबल कप ठेवतो, ज्यामध्ये तो लघवी करतो.

ही घटना उघडकीस आल्यानंतर कंपनीने डिलिव्हरी कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले. यासोबतच वुड्सच्या ऑर्डरचे पैसेही परत करण्यात आले. तथापि, वुड्सचे म्हणणे आहे की ग्रुबहबने त्याचे वितरण शुल्क आणि त्याने रायडर्सना दिलेल्या टिप्स परत केल्या नाहीत.