काय झाले किम जोंगला, अनेक देशांतील आपली दूतावास का बंद करत आहे उत्तर कोरिया?


उत्तर कोरियाने आगामी काळात अनेक देशांमधील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरिया ज्या देशांमध्ये आपले दूतावास बंद करणार आहे, त्यात स्पेन, हाँगकाँग आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरिया लवकरच जगातील एक डझनहून अधिक दूतावास बंद करणार आहे. उत्तर कोरियाच्या या पावलावर दक्षिण कोरियानेही भाष्य केले आहे.

उत्तर कोरियाने आपले राजनैतिक मिशन बंद करणे, हे देश गंभीर आर्थिक संकटाच्या काळातून जात असल्याचे द्योतक असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे उत्तर कोरिया अनेक प्रकारच्या दबावाखाली असून परदेशात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात अडचणी येत असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे.

उत्तर कोरियाने सोमवारी सांगितले की, गेल्या आठवड्यात अंगोला आणि युगांडा या दोन आफ्रिकन देशांमधील दूतावास बंद करण्याची अधिकृत सूचना देण्यात आली आहे. अंगोला आणि युगांडा या दोन्ही देशांचे उत्तर कोरियाशी 1970 च्या दशकापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तेव्हापासून ते आतापर्यंत लष्करी सहकार्य करत राहिले आणि अनेक प्रकल्पांमध्ये ते भागीदार राहिले. मात्र आता दूतावास बंद झाल्यानंतर त्यांचे राजनैतिक संबंध राहिलेले नाहीत.

उत्तर कोरियाच्या मीडिया जगतात या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था भविष्यात कोलमडू शकते, असे येथे लिहिले जात आहे. अशा परिस्थितीत देशाला अशी पावले उचलणे भाग पडते. उत्तर कोरियाच्या आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा विस्तार थांबवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत. सध्याचे संकट यामुळेच आले आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की आर्थिक संकटामुळे उत्तर कोरियाला परदेशात आपले दूतावास सुरू ठेवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत, त्यामुळे दूतावास बंद करण्याची परिस्थिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकेकाळी उत्तर कोरियाचे 159 देशांशी औपचारिक संबंध होते, पण आता हे संबंध हळूहळू कमी होत आहेत. किम जोंग याची अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र योजना उत्तर कोरियाला अडचणीत आणत आहे.