या दिवाळीत तुम्हाला मिळणार नाही भेसळयुक्त मिठाई, सरकारने उचलले मोठे पाऊल


सणासुदीला सुरुवात झाली आहे. दसऱ्यानंतर आता लोक दिवाळी, धनत्रयोदशी, भाऊबीजची वाट पाहत आहेत. या सणांमध्ये जर कशाचा सर्वाधिक वापर होत असेल, तर तो म्हणजे मिठाई. खरे तर सणांची मजा मिठाईशिवाय अपूर्ण असते. कदाचित त्यामुळेच सणासुदीचा हंगाम सुरू होताच मिठाईचा काळाबाजार सुरू होतो. देशभरात भेसळयुक्त मिठाईचा काळा व्यापार सुरू आहे. मात्र यावेळी या सणांच्या काळात तुम्हाला भेसळयुक्त मिठाईचा त्रास होऊ नये, याची सरकारने तयारी केली आहे.

खरं तर, दिवाळीच्या काळात मिठाईमध्ये भेसळ रोखण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने देशभरातील आपल्या 4,000 राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना मिठाई विक्रेते आणि उत्पादकांवर पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, जेथे असा प्रकार सुरू आहे, तेथे त्यावर कारवाई करण्यात यावी.

भारतात, दूध बहुतेक भेसळयुक्त असते आणि बहुतेक मिठाई दुग्धजन्य पदार्थांपासून बनवल्या जातात. FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलावर्धन राव यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या सणात साधारणपणे मिठाईचा खप वाढतो. त्यामुळे FSSAI ने मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आपल्या अधिकाऱ्यांना पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की राज्य अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुकानांची तपासणी करण्यास आणि गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने गोळा करण्यास सांगितले आहे. तसेच गुणवत्तेच्या निकषांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

सणासुदीच्या काळात लोकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये, म्हणून FSSAI ने या वर्षी पाळत ठेवणाऱ्या नमुन्यांची संख्या एक लाखांपर्यंत वाढवली असून पुढील वर्षी ती सात लाखांपर्यंत वाढेल. याशिवाय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (NDDB) आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सर्वेक्षण केले जात आहे. या शासकीय सर्वेक्षणात सुमारे 10 हजार नमुने घेण्यात येणार आहेत. महिनाभरात हे सर्वेक्षण पूर्ण होईल. या कारवाईमुळे भेसळ करणारे पकडले जातील आणि सर्वसामान्यांना सणाच्या काळात खऱ्याखुऱ्या मिठाईचा आस्वाद घेता येईल, अशी अपेक्षा आहे.