‘कोरोनामुळे होत आहे हृदयविकाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ’, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांचे मोठे वक्तव्य


कोरोना विषाणूमुळे देशात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की ज्या लोकांनी यापूर्वी कोविडचा सामना केला होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाचा धोका असू शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासाचा हवाला देत सांगितले की, कोविड विषाणूचा गंभीर संसर्ग झालेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून एक किंवा दोन वर्षे जास्त परिश्रम करु नये.

गुजरातमध्ये अलीकडेच हृदयाशी संबंधित समस्यांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात नवरात्रोत्सवादरम्यान ‘गरबा’ खेळताना झालेल्या एकाचा समावेश आहे. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल यांनी ‘हृदयरोग तज्ज्ञ’सह वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक घेतली. कारणे आणि उपचार शोधण्यासाठी पटेल यांनी तज्ञांना मृत्यूची आकडेवारी गोळा करण्यास सांगितले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण कोरोना विषाणू आहे.

याबाबत हृदयरोगतज्ज्ञ सांगतात की, कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांच्या तपासणीदरम्यान, कोरोना विषाणूमुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचे स्पष्ट झाले. या गुठळ्यांमुळे हृदयाला रक्त पंप करण्यात अडचण येत आहे. यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका येत आहे. क्लोट तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाचे दुष्परिणाम.

चिंतेची बाब म्हणजे कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या शरीरात या गुठळ्या तयार होत असतात. माणूस बाहेरून तंदुरुस्त दिसत असला तरी त्याच्या हृदयाच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होत असतात. अनेक प्रकरणांमध्ये, कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यामुळेच हृदयविकाराचा झटका अचानक येत असून लोकांचा मृत्यू होत आहे.

हृदयरोगतज्ज्ञ पुढे सांगतात की, कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या लोकांनी जड वर्कआउट करणे टाळावे. अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा. कारण व्यायामादरम्यान शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. अशा परिस्थितीत, फुफ्फुसांवर दबाव येतो आणि हृदय देखील वेगाने रक्त पंप करू लागते. कोरोना किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हृदयात रक्ताची गुठळी झाली असेल, तर जड व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.