भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


भारताचे महान फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले आहे. बेदी 77 वर्षांचे होते. बेदी दीर्घकाळ आजारी होते आणि सोमवारी 23 ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिशनसिंग बेदी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते आणि त्यांनी 250 हून अधिक कसोटी विकेट घेतल्या होत्या. बेदी यांनी 1966 ते 1979 या 12 वर्षांत भारतासाठी 67 कसोटी सामने आणि 10 एकदिवसीय सामने खेळले. या काळात त्यांनी अनेक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले. बेदी यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला, कारण ते सर्वात मोठे नाव आणि फिरकी चौकडीचा सर्वात महत्त्वाचा भाग होते, ज्यांनी जगभरातील फलंदाजांसाठी डोकेदुखी निर्माण केली होती आणि भारताला कसोटीत घरच्या भूमीवर गणली जाणारी शक्ती बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

आपली साधी पण सुंदर अॅक्शन आणि फ्लाईटमुळे विशेष ठसा उमटवणारे बिशनसिंग बेदी दीर्घकाळ भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारे गोलंदाज होते. त्यांनी 31 डिसेंबर 1966 रोजी ईडन गार्डन्स, कोलकाता येथे वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि 1979 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. या काळात त्यांनी भारताकडून 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट घेतल्या.

दिग्गज कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वाखाली, बेदी यांच्यासह इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर आणि एस वेंकटराघवन यांनी फिरकी चौकडी तयार केली, ज्यांनी इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांवर हळूहळू भारताला क्रिकेटच्या मैदानावर यश मिळवून दिले. 1976 मध्ये त्यांना पतौडीनंतर संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्यांनी 22 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखालीच वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताने पोर्ट ऑफ स्पेन कसोटीत विक्रमी 416 धावांचा पाठलाग करून विजय मिळवला, ज्यामुळे वेस्ट इंडिज संघ संतप्त झाला. यानंतर, वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी किंग्स्टनमध्ये भारतीय फलंदाजांना लक्ष्य केले आणि 5 फलंदाजांना रुग्णालयात पाठवले, त्यानंतर बेदी यांनी रागात दुसऱ्या डावात केवळ 97 धावांवर डाव घोषित केला.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही माजी कर्णधार बेदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एका ट्विटमध्ये, बोर्डाने बेदी यांच्या कुटुंबियांबद्दल आणि त्यांच्या चाहत्यांप्रती शोक व्यक्त केला आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी कामना केली.

40 वर्षांहून अधिक काळ, बेदी भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे डावखुरा फिरकी गोलंदाज होते. 2023 मध्ये अखेर रवींद्र जडेजाने हा विक्रम आपल्या नावावर केला. एकंदरीत, बेदींनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 370 सामन्यांत 1560 बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे ते भारतीय गोलंदाज होते.