गोष्ट त्या क्रुकर्मी सीरियल किलरची ज्याने 190 हून अधिक मुलांची केली होती हत्या


‘द बीस्ट’ म्हणून ओळखला जाणारा कोलंबियाचा कुख्यात सीरियल किलर लुईस अल्फ्रेडो गाराविटो याचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या वेळी गाराविटोने 1990 च्या दशकात 190 हून अधिक मुलांची हत्या केल्याची कबुली दिली. सीरियल किलर गाराविटोने ज्या मुलांची हत्या केली, त्यातील बहुतेक मुले 8 ते 16 वर्षे वयोगटातील होती.

गाराविटोने पीडितांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध पोशाख घालायचा. तो कधी साधु, तर कधी बेघर व्यक्ती किंवा रस्त्यावरील विक्रेत्याचा वेष वापरत असे. जीव घेण्यापूर्वी तो लहान मुलांचे अपहरण करून त्यांच्यावर अत्याचार करायचा. अर्मेनिया आणि तुंजा सारख्या कोलंबियन शहरांमध्ये हरवलेल्या मुलांचे वृत्त समोर येऊ लागले, तेव्हा गाराविटोचा गुन्हा अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.

एप्रिल 1999 मध्ये, गारविटोला बलात्काराच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, परंतु तपासादरम्यान, 114 मुलांच्या मृत्यूसाठी तो जबाबदार आहे का असे न्यायाधीशांनी विचारले असता, गाराविटोने दोषी असल्याचे कबूल केले. याशिवाय त्याने आणखी खून केल्याची कबुली दिली. म्हणजे गाराविटोने एकूण 190 हून अधिक मुलांची हत्या केली होती.

न्यायालयीन सुनावणीच्या वेळी, गाराविटोने पीडितांच्या कुटुंबियांची जाहीरपणे माफी मागितली आणि म्हटले, “मी जे केले त्याबद्दल मला माफी मागायची आहे, आणि मी कबूल करतो की मी त्यांना मारले, आणि फक्त त्यांनाच नाही तर मी इतरांना मारले.”

गारविटोची तुरुंगातून सुटका झाली नाही. 2021 मध्ये, तत्कालीन अध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी त्याच्या स्वातंत्र्याची शक्यता ठामपणे नाकारली आणि तो तुरुंगातच राहिल असे आदेश दिले. दरम्यान गाराविटोच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.