आजारी शुभमन गिलला मिळाली गुड न्यूज, ICC ने त्यांचा केला विशेष पुरस्कार देऊन गौरव


भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज शुभमन गिल सध्या डेंग्यूने त्रस्त असून त्यामुळे तो एकदिवसीय विश्वचषकातील पहिले दोन सामने खेळू शकला नाही. भारताला एकदिवसीय विश्वचषकात आपला पुढचा सामना शनिवारी पाकिस्तान विरुद्ध खेळायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात गिलला खेळणे अवघड आहे, मात्र याच दरम्यान गिलला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. गिल ICC चा एक विशेष पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

आयसीसी दर महिन्याला कामगिरीच्या आधारे सर्वोत्तम खेळाडूची निवड करते. गिलची सप्टेंबर महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार म्हणून निवड झाली आहे. मात्र, गिलने या महिन्यात एकही सामना खेळलेला नाही आणि टीम इंडियाला आशा आहे की गिल लवकर बरा होईल जेणेकरून भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल.


गिलने सप्टेंबर महिन्यात आठ डावांत एकूण 480 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटने दोन शतके झळकावली. याशिवाय गिलने तीन अर्धशतके झळकावली होती. आशिया कपमध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध 121 धावांची खेळी केली होती. यानंतर त्याने इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 धावांची खेळी केली. त्याने मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 74 धावांची इनिंग खेळली होती. आशिया कपमध्ये त्याने पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध अर्धशतके झळकावली होती. त्याच्या कामगिरीमुळेच भारताला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात आणि जिंकण्यात मदत झाली.

विश्वचषकात गिल आपला फॉर्म कायम ठेवेल अशी अपेक्षा होती पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी तो डेंग्यूला बळी पडला. याच कारणामुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही. तो अफगाणिस्तानविरुद्धही खेळला नाही. आता पाकिस्तानविरुद्धही त्याच्या खेळण्याबाबत शंका आहे. मात्र, गिलने गुरुवारी नेटमध्ये सराव केला. आता तो पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यास पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे पाहावे लागेल. जर गिल पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही, तर तो 19 तारखेला बांगलादेशविरुद्ध खेळू शकतो.