पाकिस्तानमध्ये मारला गेला भारताचा मोस्ट वॉन्टेड शाहिद लतीफ, पठाणकोट हल्ल्याचा होता मास्टरमाईंड


भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानातील सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. लतीफ हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. लतीफ हा सियालकोटमध्ये जैशसाठी काम करायचा. दहशतवाद्यांना तयार करणे आणि हल्ल्याचे नियोजन करणे ही त्याची जबाबदारी होती.

पठाणकोटशिवाय त्याने जम्मू-काश्मीरमध्ये जैशच्या अनेक कारवाया हाताळल्या. आज सकाळी तो सियालकोटमध्ये मित्रासोबत असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. जैशचा हा दहशतवादी भारतीय यंत्रणांच्या रडारवर होता. भारतीय एजन्सी देखील शाहिद लतीफवरील हल्ल्याचा तपशील घेत आहेत, कारण तो भारतात मोस्ट वॉन्टेड होता.

जैशच्या दहशतवाद्यांनी 2016 मध्ये पठाणकोट एअरबेसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते, तर अनेक जखमी झाले. यानंतर पठाणकोटमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुमारे तीन दिवस ऑपरेशन चालले. या कारवाईत भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.

शाहिद लतीफच्या मदतीमुळेच हा हल्ला करण्यात आला. लतीफने त्या दहशतवाद्यांना बरीच मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. शस्त्रेही पुरविण्यात आली. शाहिद लतीफला 1994 मध्ये अटक करण्यात आली होती. 16 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर त्याला 2010 मध्ये पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आले. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केल्याप्रकरणीही शाहिद आरोपी होता.