World Cup 2023 : राहुल-कोहलीची भागीदारी, जडेजा-कुलदीपची फिरकी… टीम इंडियाच्या विजयात चमकले हे 5 खेळाडू


टीम इंडियाने वर्ल्ड कप-2023 ची सुरुवात विजयाने केली आहे. चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत 199 धावांवर रोखला. टीम इंडियाने 200 धावांचे लक्ष्य 41.2 षटकात 4 गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियाच्या विजयात विराट कोहली, केएल राहुल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राहुल 97 धावांवर नाबाद राहिला तर कोहली 85 धावा करून बाद झाला. टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो कोण होते, चला जाणून घेऊया…

रवींद्र जडेजा- टीम इंडियाच्या विजयात रवींद्र जडेजाने महत्त्वाची भूमिका बजावली. जडेजाच्या गोलंदाजीमुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला 199 धावांवर रोखू शकली. जडेजाने 10 षटकात 28 धावा देत 3 बळी घेतले. त्याने स्टीव्ह स्मिथ, लॅबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांच्या विकेट घेतल्या. जडेजाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिली नाही.

कुलदीप यादव- रवींद्र जडेजाच नाही, तर कुलदीप यादवनेही ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा पर्दाफाश केला. त्याने ऑस्ट्रेलियाचे दोन बळी घेतले, ज्यात डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा समावेश होता. दोघेही फलंदाजी करताना वेगाने धावा करतात. वॉर्नर आणि मॅक्सवेलने मोठी खेळी केली असती, तर सामन्याची परिस्थिती वेगळी असती. कुलदीपने 10 षटकात 42 धावा दिल्या आणि 2 महत्त्वाचे बळी घेतले.

जसप्रीत बुमराह- जसप्रीत बुमराहने भारतीय गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने टीम इंडियाला सुरुवातीचे यश मिळवून दिले. बुमराहने डावाच्या तिसऱ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने सलामीवीर मिचेल मार्शला स्लीपमध्ये कोहलीकरवी झेलबाद केले. बुमराहने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बुमराहने किफायतशीर गोलंदाजी करत 10 षटकात 35 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले.

विराट कोहली- टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने वर्ल्ड कपमध्येही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने 85 धावांची शानदार खेळी केली. कोहलीच्या या धावा अशा वेळी आल्या, जेव्हा त्याची सर्वाधिक गरज होती. टीम इंडियाची धावसंख्या एके काळी 2 धावांत 3 विकेट्स अशी होती. त्यानंतर कोहलीने जबाबदारी स्वीकारली आणि चौथ्या विकेटसाठी केएल राहुलसोबत शतकी भागीदारी केली. दोघांमध्ये 165 धावांची भागीदारी झाली. कोहलीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. कोहली शतकाकडे वाटचाल करत होता. पण 85 च्या वैयक्तिक स्कोअरवर हेजलवुडने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

केएल राहुल- टीम इंडियाने वर्ल्ड कप-2023 ची सुरुवात विजयाने केली आहे, त्यामुळे याचे मोठे श्रेय केएल राहुलला जाते. राहुलच्या नाबाद 97 धावांच्या जोरावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पार करता आली. राहुल शेवटपर्यंत ठाम राहिला. तो क्रीजवर आला, तेव्हा टीम इंडियाची धावसंख्या 2 धावांत 3 विकेट्स अशी होती. यानंतर त्याने कोहलीसह डाव सांभाळला आणि धावसंख्या 167 धावांपर्यंत नेली. राहुलने 115 चेंडू खेळले. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. राहुलला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.