World Cup 2023 : शुभमन गिल डेंग्यूच्या विळख्यात, पहिला सामना खेळणे कठीण


भारतीय क्रिकेट संघ रविवारी वनडे विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भारताशी भिडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात शुभमन गिल खेळणार नाही, हे निश्चित झाले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शुभमन गिलची डेंग्यू चाचणी पॉझिटिव्ह आली असून सामन्याच्या दिवसापर्यंत त्याला बरे होणे कठीण आहे.

गिलने गुरुवारी प्रशिक्षण सत्रातही सहभाग घेतला नाही. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वृत्तपत्राने आपल्या वृत्तात या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की संघ व्यवस्थापन गिलची काळजी घेत आहे आणि पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या चाचणीनंतर घेतला जाईल.

या सामन्यात गिल खेळला नाही, तर भारतासमोर रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार निवडण्याचे आव्हान असेल. त्याचा प्रबळ दावेदार पुन्हा इशान किशन आहे. संघ सलामीला केएल राहुललाही आजमावू शकतो. तो सलामीवीर आहे, पण एकदिवसीय सामन्यांमध्ये तो संघाच्या गरजेनुसार मधल्या फळीत खेळतो. काहीही झाले, तरी गिलची अनुपस्थिती भारतासाठी तणावाची ठरेल, कारण तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गिलने अलीकडेच 24 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शतक झळकावले. त्याने मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 74 धावांची इनिंग खेळली होती.

भारताला पहिला सामना चेन्नईमध्ये खेळायचा आहे, जिथे खेळपट्टी फिरकीपटूंना उपयुक्त मानली जाते. ऑस्ट्रेलियाकडे अॅडम झम्पासारखा फिरकी गोलंदाज आहे, ज्याच्याकडे भारताला अडचणीत आणण्याची ताकद आहे. गिल हा अशा भारतीय फलंदाजांपैकी एक आहे, जो फिरकीपटूंना चांगला खेळतो आणि त्यामुळेच चेन्नईमध्ये खेळणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे, जर तो खेळला नाही, तर भारताला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.