Cough Syrup : गुजरातमध्ये बनवलेल्या या कफ सिरपमध्ये सापडले घातक केमिकल, थांबवले उत्पादन


गुजरातमधील एका औषध कंपनीत बनवलेल्या कफ सिरपच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. या कफ सिरपमध्ये शरीराला हानी पोहोचवणारी घातक केमिकल आढळून आल्याचा आरोप आहे. गुजरातच्या अन्न आणि औषध नियंत्रण विभागाने कफ सिरपचे उत्पादन बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. विभागातील प्रशासकीय आयुक्त एचजी कोसिया यांनी सांगितले की, गुजरातस्थित फार्मास्युटिकल कंपनी नॉरिस मेडिसिन्स लिमिटेडची तपासणी करण्यात आली. यामध्ये कंपनीत तयार होणाऱ्या कफ सिरपची चाचणी घेण्यात आली. कफ सिरपमध्ये घातक रसायने असल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे.

अशा स्थितीत कंपनीला औषधाचे उत्पादन थांबवून बाजारात असलेले सिरप मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान, कंपनीने औषधांच्या निर्मितीबाबत सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे योग्य पालन केले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या घटनेपूर्वीही कफ सिरपबाबत अनेक वाद झाले आहेत. उझबेकिस्तान आणि गाम्बियामध्ये भारतीय बनावटीचे कफ सिरप प्राणघातक असल्याचे सांगण्यात आले. भारतात बनवलेले कफ सिरप प्यायल्याने या देशांतील मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. डब्ल्यूएचओने कफ सिरपचेही धोकादायक वर्णन केले होते. त्यादरम्यान भारत सरकारने औषध कंपन्यांवर कारवाई केली होती.

यानंतर इराकमध्येही भारतात बनवलेल्या कफ सिरपबाबत इशारा देण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने असेही म्हटले होते की, भारतात बनवले जाणारे कफ सिरप मानकांनुसार बनवले जात नाही. कफ सिरपमुळे मुलांमध्ये किडनी इन्फेक्शन आणि डायरियासारख्या समस्या उद्भवू शकतात.

एपिडेमियोलॉजिस्ट म्हणतात की आजही अनेक औषध कंपन्या आहेत,ज्या औषधे बनवण्यासाठी चांगल्या उत्पादन पद्धतीचे पालन करत नाहीत. त्यामुळे निर्धारित मानकांनुसार औषधे बनवली जात नाहीत. काही प्रकरणांमध्ये औषध योग्य आहे, परंतु त्याच्या ओव्हरडोजमुळे दुष्परिणाम होतात.

गेल्या काही महिन्यांमध्ये नोंदवलेल्या कफ सिरपच्या दुष्परिणामांच्या बाबतीत, औषधाचा ओव्हरडोज हे एक प्रमुख कारण असू शकते. ओव्हरडोसमुळे किडनी इन्फेक्शन, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.