Asian Games : होणार नाही भारत-पाकिस्तान फायनल, अफगाणिस्तानने केली पाकिस्तानच्या स्वप्नाची राखरांगोळी


आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले आहे. हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 18 षटकांत 115 धावांत आटोपला आणि प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने 17.5 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. आता सुवर्णपदकासाठी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. हा सामना शनिवारी होणार आहे.

पाकिस्तानची फलंदाजी आणि गोलंदाजी प्रचंड फ्लॉप ठरली. बाद फेरीत अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदिन नायबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्णय पूर्णपणे योग्य होता. पाकिस्तानचा सलामीवीर मिर्झा बेग 4 धावांवर धावबाद झाला. यष्टिरक्षक रोहेल नाझीरलाही 10 धावा करता आल्या. यानंतर पाकिस्तानची मधली फळी पत्त्याच्या गठ्ठासारखी कोसळली. हैदर अली 2, कर्णधार कासिम अक्रम-9, खुशदिल शाह- 8 धावा करून बाद झाले. आसिफ अलीने केवळ 8 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ केवळ 115 धावा करू शकला.

अफगाणिस्तानच्या संघाला केवळ 116 धावा करायच्या होत्या. पण हागझोऊच्या अवघड खेळपट्टीवरही या धावा पुरेशा होत्या. अफगाण संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. सलामीवीर सेदीकल्लाह अटल आणि मोहम्मद शहजाद 9 धावा करून बाद झाले. शाहिदउल्ला कमालला खातेही उघडता आले नाही. नूर अली झद्रानने 33 चेंडूत 39 धावा आणि कर्णधार गुलबदिन नईने 19 चेंडूत नाबाद 26 धावा करत अफगाणिस्तानला अंतिम फेरीत नेले.

तत्पूर्वी, भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करून सुवर्णपदकाचा सामना पक्का केला. बांगलादेशचा संघ भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 96 धावांत गारद झाला आणि त्यानंतर केवळ 9.2 षटकांतच लक्ष्य सहज गाठले. टिळक वर्माने 55 धावांची नाबाद खेळी तर कर्णधार रुतुराज गायकवाडने 40 धावांची नाबाद खेळी खेळली. साई किशोरने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. या खेळाडूने 4 षटकात फक्त 12 धावा देत 3 बळी घेतले.