Asian Games 2023 : फिरकीपटूंनंतर तिलक वर्माचे वादळ, बांगलादेशचा पराभव, भारताचे पदक निश्चित


चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशचा नऊ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह टीम इंडियानेही आपले पदक निश्चित केले आहे. प्रथम, भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना टिकू दिले नाही आणि 20 षटकांत नऊ विकेट गमावून केवळ 96 धावाच करू दिल्या. टीम इंडियाने हे सोपे लक्ष्य 9.2 षटकात एक विकेट गमावून पूर्ण केले. तिलक वर्माने 55 धावांची नाबाद खेळी खेळली.

बांगलादेशची टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर टीम इंडियाच्या फिरकीपटूंसमोर टिकू शकली नाही. संघाचे केवळ तीनच फलंदाज दुहेरी धावा करू शकले. तर भारताने फक्त एक विकेट गमावली. यानंतर तिलक आणि गायकवाड यांनी शानदार भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले.

भारताला 97 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले होते, पण टीम इंडियाला चांगली सुरुवात करता आली नाही. मागील सामन्याचा शतकवीर यशस्वी जैस्वाल पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. रिपन मोंडलने त्याला मृत्युंजय चौधरीकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. पण यानंतर कॅप्टन गायकवाड आणि तिलकने भारताला आणखी धक्का बसू दिला नाही. तिलकने 26 चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावांची खेळी केली. तर गायकवाडने 26 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.

तत्पूर्वी, भारतीय फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी करत बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. डावखुरा फिरकीपटू साई किशोरने महमुदुल हसन जॉयला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने पाच धावा केल्या. येथून पुन्हा बांगलादेश संघाने सातत्याने विकेट गमावल्या. संघाकडून झकर अलीने सर्वाधिक नाबाद 24 धावा केल्या. त्याने 29 चेंडूंच्या खेळीत केवळ एक चौकार मारला. परवेझ हसन इमॉनने 23 धावा केल्या. रकीबुल हसनने 14 धावा केल्या. साई किशोरने तीन विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने 2 विकेट घेतल्या, तर तिलक, रवी बिश्नोई आणि शाहबाज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.