World Cup 2023 FAQ : रिझर्व्ह डे, सुपर ओव्हर आणि बरेच काही… जाणून घ्या वर्ल्ड कपशी संबंधित मोठ्या प्रश्नांची उत्तरे


12 वर्षांनंतर विश्वचषक भारतात परतला असून आजपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. 2011 मध्ये ही स्पर्धा भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती, परंतु यावेळी संपूर्ण विश्वचषकाचे यजमानपद फक्त भारतच करत आहे. इतकेच नाही, तर 1987 नंतर प्रथमच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक खेळवला जात आहे. गेल्या वेळीही ही स्पर्धा भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळली गेली होती. प्रत्येकाच्या मनात विश्वचषकाशी संबंधित अनेक प्रश्न असतील. त्यांच्यामध्ये काही प्रश्न असतात जे प्रत्येक सामन्यानंतर निर्माण होतात. अशा काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील.

सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्याचा चॅम्पियन इंग्लंड आणि शेवटचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळला जाणार आहे. यजमान भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या मूलभूत माहितीनंतर, आता आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला विश्वचषकादरम्यानचे नियम समजणे सोपे जाईल.

विश्वचषक स्पर्धेत होत आहेत किती संघ सहभागी? काय आहे स्पर्धेचे स्वरूप ?
2019 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाप्रमाणे यावेळीही केवळ 10 संघ सहभागी होत आहेत. यजमान भारताशिवाय ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. स्पर्धेचे स्वरूप देखील पूर्वीसारखेच आहे – राउंड रॉबिन. यामध्ये प्रत्येक संघ इतर संघांसोबत प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच प्रत्येक संघ 9 सामने खेळणार आहे.

कोणत्या शहरात खेळवले जातील हे सामने? कधी आणि कुठे होणार सेमीफायनल आणि फायनल ?
वर्ल्ड कपसाठी एकूण 10 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत – अहमदाबाद, मुंबई, धर्मशाला, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, लखनौ आणि पुणे. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होईल, तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबरला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होईल. मात्र, यामध्येही एक अट आहे. जर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर त्याचा सामना मुंबईतच होणार आहे. उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला, तर हा सामना कोलकात्यातच होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

संघांना मिळतील किती गुण? समान गुण असतील तर कसा घेणार निर्णय ?
सामना जिंकल्यास 2 गुण दिले जातील, तर तो रद्द झाल्यास, दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी 1 गुण विभागला जाईल. सर्वाधिक गुण मिळवणारे शीर्ष 4 संघ उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत जातील. पहिल्या उपांत्य फेरीत, गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना चौथ्या स्थानावरील संघाशी होईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ दुसऱ्या उपांत्य फेरीत आमनेसामने येतील.

कोणत्याही दोन किंवा तीन संघांचे गुण समान असतील तर अशा स्थितीत अधिक सामने जिंकणारा संघ अव्वल असेल. जर संघांनी जिंकलेले गुण आणि सामन्यांची संख्या समान असेल तर नेट रनरेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. येथेही बरोबरी झाली, तर त्या संघांमधील सामन्याच्या निकालाच्या आधारे गुणतालिकेतील क्रमवारी निश्चित केली जाईल. जर तो सामनाही रद्द झाला, तर स्पर्धेच्या सुरुवातीला दोन्ही संघांच्या सीडिंगच्या आधारे स्थान निश्चित केले जाईल.

सामन्यांसाठी किती राखीव दिवस असतील?
राखीव दिवसाची तरतूद फक्त उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी आहे. या तीन सामन्यांसाठी प्रत्येकी एक राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, नियमांनुसार पंचांचा पहिला प्रयत्न असेल की षटके कापली तरी सामना त्याच दिवशी संपेल. कोणत्याही परिस्थितीत, सामना पूर्ण करण्यासाठी (निकाल मिळविण्यासाठी), किमान 20-20 षटकांचा सामना असणे आवश्यक आहे.

तसे झाले नाही, तर राखीव दिवशी सामना जिथे थांबला होता, तिथून सुरू होईल. राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही, तर गुणतालिकेत जो संघ अव्वल असेल, तो अंतिम फेरीत जाईल. म्हणजेच अंतिम सामना पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये होईल. राखीव दिवशीही अंतिम सामना पूर्ण झाला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

2019 च्या विश्वचषकाप्रमाणे ‘बाउंड्री काउंट’वर आधारित निर्णय होईल का?
2019 विश्वचषक फायनलमधील वादानंतर आयसीसीने हा नियम रद्द केला होता. आता सुपर ओव्हर टाय झाल्यास, सुपर ओव्हर पुन्हा खेळली जाईल आणि विजेता निश्चित होईपर्यंत हे होईल. हा नियम पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत लागू असेल. उपांत्य फेरीत सामना बरोबरीत सुटला, परंतु कोणत्याही परिस्थितीत सुपर ओव्हर शक्य नसेल, तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम फेरीत पोहोचेल.

किती वाजता सुरू होतील सामने? ते कुठे पाहता येईल?
5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान विश्वचषक स्पर्धेत एकूण 45 साखळी सामने, 2 उपांत्य फेरी आणि 1 अंतिम सामना खेळवला जाईल. म्हणजे एकूण 48 सामने. यापैकी साखळी टप्प्यातील 6 सामने ‘डे-मॅच’ असतील आणि उर्वरित सर्व ‘डे-नाईट’ (उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह) असतील. दिवस-सामने सकाळी 10.30 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होतील, तर दिवस-रात्र सामने दुपारी 2.30 वाजता सुरू होतील. हे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर पाहता येतील. टीम इंडियाचे सामने डीडी स्पोर्ट्सवरही पाहता येतील. हॉटस्टारवर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहता येईल.