भारत-पाकिस्तान दरम्यान खेळली जावी गांधी-जिना ट्रॉफी, बीसीसीआयकडे पीसीबीचा प्रस्ताव


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी बीसीसीआयसमोर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेचा प्रस्ताव ठेवला आहे. अश्रफ म्हणाले की, अॅशेसप्रमाणे हेही दरवर्षी व्हायला हवे. पीसीबी प्रमुख म्हणाले की, अॅशेसप्रमाणे वार्षिक गांधी-जिना ट्रॉफी खेळवण्याचा मी बीसीसीआयला प्रस्ताव दिला होता. या मालिकेसाठी भारत आणि पाकिस्तान एकमेकांचा दौरा करू शकतात.

2014 पासून भारत आणि पाकिस्तानने कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. नुकतेच आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळले. या स्पर्धेत दोन सामने झाले, त्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला. तर, टीम इंडियाने दुसरा सामना सहज जिंकला होता.

हा तोच झका अश्रफ आहे, जो काही दिवसांपूर्वी भारताला शत्रू देश म्हणत होता आणि आज तो भारताशी खेळण्यासाठी हतबल झाला आहे. अधिक पैसा संघाला शत्रू देशात विश्वचषक खेळण्याची हिंमत देईल, असे तो म्हणाला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. नंतर त्यांनी सावरासावर देखील केली. झका अश्रफ यांनी नंतर सांगितले की, हैदराबादमध्ये पाकिस्तान संघाचे शानदार स्वागत झाले, त्याबद्दल धन्यवाद.

पीसीबीने स्पष्ट केले की बोर्ड अध्यक्षांचा असा विश्वास आहे की भारत नेहमीच पाकिस्तानपेक्षा जगाला आकर्षित करतो, म्हणूनच क्रिकेट जगतात नेहमीच त्याची प्रतीक्षा केली जाते. तुम्हाला सांगतो की पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात आला आहे. हैद्राबाद येथील हॉटेलमध्ये टीमचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनीही त्याचे कौतुक केले आहे.