Asian Games : टीम इंडियाने मिळवले उपांत्य फेरीचे तिकीट, उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा 23 धावांनी केला पराभव


जशी अपेक्षा होती, त्या प्रमाणेच निकाल लागला. भारताला उपांत्य फेरीसाठी जागा मिळायला हवी होती आणि ती मिळवलीच. भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने अभिमानाने उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई क्रीडा 2022 च्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा पराभव केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघ पहिल्यांदाच सहभागी होत आहे आणि पहिल्यांदाच सुवर्णपदकाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

आशियाई क्रीडा 2023 च्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 202 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नेपाळने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण विजयाचे लक्ष्य गाठण्यात ते कमी पडले. मात्र, हा सामना अपेक्षेप्रमाणे एकतर्फी झाला नाही. नेपाळने जरी हा सामना जिंकला नसला, तरी आपल्या मेहनतीने सर्वांची मने नक्कीच जिंकली.

भारताने दिलेल्या 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळच्या संघाने वेगवान सुरुवात केली. मात्र, त्याची वेगवान सुरुवात आवेश खानने रोखली, जेव्हा त्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर नियमित अंतराने नेपाळच्या विकेट पडत राहिल्या. पण, या काळातही त्यांनी लढण्याची वृत्ती सोडली नाही. नेपाळच्या प्रत्येक फलंदाजाने संघाच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण, भारताने धावफलकावर इतक्या धावा सोडल्या होत्या की त्यातून सावरणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.

भारताने या सामन्यात 6 गोलंदाज आजमावले, त्यापैकी रवी बिश्नोई आणि आवेश खान हे सर्वाधिक यशस्वी ठरले. दोघांनी 3-3 विकेट घेतल्या. याशिवाय पदार्पण करणाऱ्या साई किशोरने सामन्यात 1 बळी आणि 3 झेलही घेतले.

याआधी भारताकडून यशस्वी जैस्वालने शतक झळकावले. त्याने 49 चेंडूत 100 धावा केल्या, ज्यात त्याने 7 षटकार आणि 8 चौकार लगावले. यशस्वीशिवाय, रिंकू सिंगने शानदार खेळी पूर्ण केली, त्याने 15 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या.