भारताला ‘शत्रू देश’ म्हणून फसले PCB प्रमुख, आता करत आहेत सारवासारव


सध्या पाकिस्तानाचा क्रिकेट संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आहे, जिथे त्याचे हैदराबादमध्ये भव्य स्वागत झाले. पाकिस्तानने आपला पहिला सराव सामनाही येथे खेळला आहे, ज्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या दौऱ्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांचे एक विधान वादात सापडले आहेत, कारण त्यांनी भारताला शत्रू देश म्हटले होते. मात्र या गदारोळानंतर त्यांनी आता सारवासारव सुरु केली असून त्याला मैदानावरील चांगली लढत म्हणून पाहण्यास सांगितले आहे.

ज्या दिवशी पाकिस्तानी संघ भारतात पोहोचला, त्याच दिवशी पीसीबीने आपल्या खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर झका अश्रफ यांचे वक्तव्य आले होते की, अधिक पैसे शत्रू देशात विश्वचषक खेळण्याची हिंमत संघाला देईल, या विधानावर गदारोळ झाला होता. मात्र, नंतर पीसीबीने स्पष्ट केले की हैदराबादमध्ये पाकिस्तानी संघाचे अप्रतिम स्वागत झाले आहे, याबद्दल झका अश्रफ यांनी भारतीयांचे आभार मानले आहेत.

पीसीबीने सांगितले की, बोर्ड अध्यक्षांनी सांगितले होते की, भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा ते शत्रू नसून चांगले प्रतिस्पर्धी असतात. पीसीबीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, बोर्ड अध्यक्षांचा असा विश्वास आहे की भारत-पाकिस्तान सामने नेहमीच जगाला आकर्षित करतात, म्हणूनच क्रिकेट जगतात नेहमीच त्याची प्रतीक्षा केली जाते.

भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाचा प्रवेश वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याआधी पाकिस्तानी मीडियाकडून टीमला व्हिसा मिळण्यास विलंब झाल्याचा दावा केला जात होता, मात्र नंतर खुद्द पाकिस्तानी टीमनेच व्हिसासाठी अर्ज करण्यास विलंब केल्याचे उघड झाले. 27 सप्टेंबर रोजी, पाकिस्तानी संघ शेवटी हैदराबादला पोहोचला, जिथे विमानतळावर त्याचे भव्य स्वागत करण्यात आले आणि शेकडो चाहतेही जमले.

पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 345 धावा केल्या होत्या, तर न्यूझीलंडने हे लक्ष्य 7 षटकांपूर्वीच गाठले होते. मात्र, सराव सामन्यातील मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांच्या शानदार खेळीनेही संघाच्या अनेक आशा पल्लवित केल्या.