शाहजहानने प्रेमात बांधला ताजमहाल, रतन टाटांच्या आजोबांनी उभे केले टाटा मेमोरियल, अशी होती प्रेमकहाणी


मुघल सम्राट शाहजहानने आपली पत्नी मुमताज हिच्या असलेल्या प्रेमाखातर जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेला ‘ताजमहाल’ बांधला. आज जगभरातून लाखो लोक ते पाहण्यासाठी दरवर्षी भारतात येतात. जगभरात याकडे प्रेमाचे सर्वात मोठे प्रतीक म्हणून पाहिले जाते. पण रतन टाटा यांच्या आजोबांची प्रेमकहाणी कदाचित तुम्हाला माहीत नसेल, ज्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ एक संस्था उभारली, जी आज लाखो लोकांचे जीवन सावरण्याचे काम करत आहे. ही प्रेमकथा खूप खास आहे…

आम्ही दोराबजी टाटा आणि मेहेरबाई टाटा यांच्याबद्दल बोलत आहोत. 14 फेब्रुवारी 1898 रोजी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी दोघांनी लग्न केले. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे ज्येष्ठ पुत्र होते. भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक संघाला परदेशात पाठवण्यासाठी निधी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या संघाने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी हॉकीमध्ये सुवर्ण मिळवून दिले. दोराबजी आणि मेहेरबाई टाटा यांची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे…

दोराबजी टाटा यांनी त्यांची पत्नी मेहरबाई टाटा यांना त्यांच्या लग्नाच्या 2 वर्षानंतर एक हिरा भेट दिला. हा हिरा कोहिनूर हिऱ्यापेक्षा जवळपास दुप्पट मोठा होता. मेहरबाईंनी हा जुबली हिरा नेहमी आपल्याकडे ठेवायच्या. जमशेदजी टाटा यांच्यानंतर दोराबजी टाटा यांच्याकडे टाटा समूहाची जबाबदारी आली. टाटा स्टीलला मोठी कंपनी बनवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर 1920 च्या दशकात टाटांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तेव्हा मेहेरबाईंनी पतीला मदत करण्यासाठी पुढे येऊन या हिऱ्यासह सर्व दागिने गहाण ठेवले.

मेहरबाईं यांची ओळख ‘लेडी टाटा’ अशी आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात ‘शारदा कायदा’ हा बालविवाह रोखणारा कायदा लागू होऊ शकला. हा कायदा 1929 मध्ये करण्यात आला आणि त्यात मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षे आणि मुलांचे वय 18 वर्षे ठेवण्यात आले. पुढे या कायद्यात बदल करून मुला-मुलींचे लग्नाचे वय अनुक्रमे 21 आणि 18 केले.

काही वर्षांत टाटा समूहाची परिस्थिती सुधारली आणि दोराबजी टाटांनी आपल्या पत्नीचे सर्व दागिने बँकेतून सोडवून घेतले. पण त्यांच्या प्रेमाची कसोटी अजून यायची होती. 1931 मध्ये मेहरबाई टाटा यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यांना ल्युकेमिया (रक्त कर्करोगाचा एक प्रकार) होता. त्याच वर्षी त्या 50 वर्षांच्या झाल्या होत्या. दोराबजी टाटा यांनी मेहेरबाईंवर उत्तम उपचाराची व्यवस्था केली, परंतु 1931 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पत्नीच्या निधनामुळे शोककळा पसरली आणि दोराबजी टाटा यांचेही पुढील वर्षी निधन झाले, पण त्यांच्या प्रेमाचे प्रतीक असलेले ‘टाटा मेमोरिअल’ अजूनही आहे.

होय, पत्नीच्या मृत्यूनंतर दोराबजी टाटा यांनी मेहरबाईचा तोच ‘ज्युबिली डायमंड’ विकून ‘दोराबजी टाटा ट्रस्ट’ स्थापन केली. या ट्रस्टने मुंबईत टाटा मेमोरियल हॉस्पिटल बांधले, जे आज देशभरातील लाखो कर्करोग रुग्णांवर कमी खर्चात उपचार करतात. हे त्यांच्या प्रेमाचे अनोखे प्रतिक आहे, जे आजही करोडो लोकांचे जीवन सावरत आहे.