Dadasaheb Phalke Award : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार


हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. वहिदा रहमान यांनी 60-70 च्या दशकात सिनेमावर राज्य केले. त्यांच्या चमकदार अभिनयाचे, नृत्य-अभिनय आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. वहिदा रहमान आणि देव आनंद यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. ‘सीआयडी’पासून ‘गाईड’पर्यंत या दोघांनी अनेक उत्तम चित्रपट एकत्र केले आहेत.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अनुराग ठाकूर यांनी लिहिले, ‘वहिदा रहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो.’

वहिदा रहमान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलुगू चित्रपटांमधून केली होती. त्या चित्रपटांमध्ये जास्त आयटम नंबर करायच्या. एके दिवशी गुरुदत्त यांची नजर वहिदा रहमानवर पडली आणि त्यांचे नशीब पालटले. वहिदा रहमान यांना हिंदी चित्रपटात आणणारे गुरुदत्त होते. वहिदा रहमान यांनी देवानंद यांच्यासोबत सीआयडी चित्रपटात पदार्पण केले आणि त्यानंतर प्यासा, कागज के फूल, गाइड, नील कमल, तीसरी कसम, रंग दे बसंती आणि राम और श्याम सारखे सुपरहिट चित्रपट केले.

वहिदा रहमान यांनी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. वहिदा रहमान यांना राष्ट्रीय पुरस्कार, दोनदा फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री आणि पद्मविभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.