विश्वचषकासाठी भारतात येण्यापूर्वी बाबर आझमने केला मोठा आरोप


2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषद घेतली आणि त्याने आपल्या टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला. बाबर आझमने संघाविरुद्ध सुरू असलेल्या अफवा आणि विश्वचषक जिंकण्याच्या त्यांच्या शक्यतांवर प्रतिक्रिया दिली. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाची कामगिरी निराशाजनक होती, श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर हा संघ बाहेर पडला आणि यानंतर पाकिस्तानी संघात फूट पडली आणि अनेक खेळाडू आपापसात भांडले, अशा बातम्या आल्या. मात्र, बाबरने हे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले आहे.

भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर म्हणाला, माध्यमे आमच्याविरोधात खोट्या बातम्या पसरवतात. पाकिस्तानी खेळाडू आणि ड्रेसिंग रूममध्ये मारामारी सुरू आहे, असे पसरवले जात आहे, पण तसे काही नाही. सर्व खेळाडू एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कुटुंबासारखे आहेत. पराभवानंतर नेहमीच चर्चा होते.


बाबरला विचारण्यात आले की 2023 च्या विश्वचषकात त्यांचा संघ टॉप 4 मध्ये पोहोचेल का? यावर बाबर म्हणाला, टॉप 4 खूपच कमी आहे. माझ्या मते, आम्ही फक्त 1 नंबरवर येऊ. आशिया चषक स्पर्धेनंतर आमच्याकडे केवळ एक आठवड्याचा कालावधी असल्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही. आम्ही दोन-तीन महिने सतत क्रिकेट खेळत आहोत. विश्वचषक सुरू व्हायला अजून वेळ आहे आणि आम्ही 7-8 दिवस सराव करू आणि सराव सामन्यांमध्ये आमची ताकद दाखवू.

बाबर आझमने सांगितले की, मला माझ्या संघातील सर्व 15 खेळाडूंवर विश्वास आहे. बाबर आझम म्हणाला की, मला स्वतःपेक्षा माझ्या खेळाडूंवर जास्त विश्वास आहे. या खेळाडूंनी सातत्याने संघाला सामने जिंकून दिले आहेत. पाकिस्तानी संघ सर्वत्र विजय मिळवून नंबर 1 बनला आहे.

बाबर आझम पहिल्यांदाच भारतात येत असून यावर तो म्हणाला, मी पहिल्यांदाच भारतात जात आहे. मला आशा आहे की आम्हाला तिथे प्रेम मिळेल. आशा आहे की लोकही आम्हाला पाठिंबा देण्यासाठी येतील. भारतातील पाकिस्तानी चाहत्यांना आम्ही खूप मिस करू.