सिग्नेचर लोन म्हणजे काय? फक्त एका सहीने खात्यात कसे पोहोचतात पैसे?


तुम्ही होम लोन, एज्युकेशन लोन, पर्सनल लोन आणि गोल्ड लोन बद्दल ऐकले असेलच. तुमच्या ओळखीच्या अनेक लोकांनी गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतले असेल. घर किंवा वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि तुमचे उत्पन्नही निश्चित असेल, तर बँक सहजपणे कर्ज मंजूर करते. यासाठी काही कागदपत्रे आणि आयडी प्रूफ बँकेत जमा करावे लागतात. परंतु, सिग्नेचर लोनच्या बाबतीत असे नाही. हे वेगळ्या प्रकारचे कर्ज आहे, जे बँक एखाद्या व्यक्तीला त्याच्या सहीच्या बदल्यात देते.

विशेष म्हणजे अनेकांनी सिग्नेचर लोनचे नावही ऐकले नसेल. बहुतेक लोकांना गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज याबद्दलच माहिती असते. पण, स्वाक्षरीचे कर्जही बँका चालवतात. स्वाक्षरीचे कर्ज घेण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला फक्त त्याची सही करावी लागते आणि कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात हस्तांतरित केली जाते. चला तर मग जाणून घेऊया की सिग्नेचर लोन म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारच्या लोकांना हे कर्ज मिळते.

सिग्नेचर लोनला सद्भावना कर्ज किंवा चारित्र्य कर्ज म्हणून देखील ओळखले जाते किंवा सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर हे देखील एक प्रकारचे वैयक्तिक कर्ज आहे. बँका हे कर्ज कोणत्याही तारण न देता जारी करतात. पण त्याचा व्याजदर गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा शैक्षणिक कर्जापेक्षा जास्त असतो. तथापि, त्याचा व्याजदर क्रेडिट कार्डच्या व्याजदरापेक्षा कमी आहे.

सिग्नेचर लोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कर्ज देण्यापूर्वी बँका ग्राहकाची क्रेडिट हिस्ट्री तपासतात. जेव्हा बँकेला पूर्ण विश्वास असतो की कर्ज घेणारी व्यक्ती सहजपणे कर्जाची परतफेड करेल, तेव्हाच ती कर्ज पास करते. त्याचबरोबर अनेक वेळा बँक कर्ज देण्यापूर्वी जामीनदाराचीही सही घेते. तथापि, कर्ज दिल्यानंतर, कर्ज घेणारा ईएमआय भरत नाही, तेव्हा बँक गॅरेंटरचा शोध घेते.