Asia Cup Prize Money : आशियाई चॅम्पियन टीम इंडिया झाली मालामाल; कुलदीपला मिळाले 41 लाख रुपये, जाणून घ्या कोणाला किती मिळाले बक्षीस


आशिया कप फायनलमध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत विक्रमी आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली. चॅम्पियन बनल्यानंतर टीम इंडिया मालामाल झाली आहे. भारतीय संघाला अंदाजे 1.24 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याच वेळी, उपविजेत्या श्रीलंकेला देखील अंदाजे 62 लाख रुपये मिळाले आहेत. आशिया चषक 2023 मध्ये कोणाला किती बक्षीस मिळाले ते जाणून घेऊया…

  • रवींद्र जडेजा: $3000 (2.49 लाख) सर्वोत्कृष्ट कॅच ऑफ द मॅच
  • मोहम्मद सिराज: $5000 (रु. 4.15 लाख) आणि ट्रॉफी, सामनावीर (सिराजने त्याचे बक्षीस मैदानावरील स्टाफला दान केले)
  • कुलदीप यादव: $50,000, (रु. 41.54 लाख) टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू (कुलदीपने या स्पर्धेत एकूण नऊ विकेट घेतल्या, ज्यामध्ये पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या पाच विकेट्सचा समावेश आहे)
  • श्रीलंकन ​​ग्राउंड स्टाफ: पिच क्युरेटर आणि ग्राउंड्समनला $50,000 (रु. 41.54 लाख) बक्षीस
  • श्रीलंका: उपविजेत्या संघाला $75,000 (रु. 62.31 लाख)
  • भारत: विजेत्या संघाला $150,000 (रु. 1.24 कोटी).

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण बुमराहने पहिल्याच षटकात विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. सिराजने श्रीलंकेच्या डावातील चौथ्या षटकात चार विकेट घेत संपूर्ण फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला. सिराजने त्याच्या पुढच्याच षटकात पाच बळी पूर्ण केले. हार्दिकने तीन बळी घेतले आणि सिराजला आणखी एक यश मिळाले. कुसल मेंडिसच्या 17 धावा आणि दासून हेमंताच्या 13 धावांमुळे श्रीलंकेचा संघ 50 धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने 37 चेंडूत लक्ष्य गाठले. शुभमन गिल 27 आणि इशान किशन 23 धावांवर नाबाद राहिला. भारताने हा सामना 263 चेंडू शिल्लक असताना 10 गडी राखून जिंकला.