उत्तर प्रदेशातील अयोध्येत भगवान राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधले जात आहे. या मंदिराच्या बांधकामादरम्यान जमिनीचे उत्खनन केले असता, तेथे अनेक प्राचीन शिल्पे सापडली आहेत. उत्खननादरम्यान, मंदिराचे आणखी बरेच अवशेष सापडले, जे मंदिराच्या प्रांगणातच अत्यंत काळजीने ठेवले आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे सरचिटणीस आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
रामजन्मभूमीवरील उत्खननात सापडले मंदिराचे अवशेष, मुर्त्या आणि स्तंभ
चंपत राय यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या छायाचित्रात सनातनशी संबंधित अनेक चिन्हे पाहायला मिळतात. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चित्राविषयी थोडक्यात माहितीही दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, रामजन्मभूमीच्या उत्खननादरम्यान अनेक प्राचीन मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांमध्ये विविध शिल्पे आणि स्तंभांचा समावेश आहे.
श्री रामजन्मभूमि पर खुदाई में मिले प्राचीन मंदिर के अवशेष। इसमें अनेकों मूर्तियाँ और स्तंभ शामिल हैं। pic.twitter.com/eCBPOtqE1W
— Champat Rai (@ChampatRaiVHP) September 12, 2023
न्यायालयाच्या निर्णयानंतर वादग्रस्त जागेवर रामलल्लाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. हे मंदिर तीन टप्प्यात बांधले जात असून त्यात प्रथम खालच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. रामलल्लाच्या मंदिराच्या सर्वात खालच्या मजल्याचे बांधकाम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर जानेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराचे उद्घाटन करतील आणि रामललाला थाटामाटात विराजमान केले जाईल.
यानंतर, रामलल्ला मंदिराचे बांधकाम आणखी दोन टप्प्यात पूर्ण केले जाईल, ज्यामध्ये पहिल्या मजल्याचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करायचे आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायचे आहे. मात्र, या वर्षाच्या अखेरीपर्यंत भाविकांना रामलल्ला मंदिरातच दर्शन दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.