IND vs PAK : 8 विकेट पडतच ऑलआऊट का झाला पाकिस्तानचा संघ?


अखेर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. अर्थात तो पूर्ण व्हायला दोन दिवस लागले, पण चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली. आशिया चषक-2023 च्या सुपर-4 सामन्यात सोमवारी भारताने पाकिस्तानचा 228 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. हा सामना रविवारीच संपणार होता, पण पावसामुळे राखीव दिवस वापरण्यात आला आणि सामना सोमवारी संपला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 356 धावा केल्या. या धावसंख्येसमोर पाकिस्तान संघ केवळ 128 धावा करू शकला. पाकिस्तानने आठवी विकेट गमावली, तेव्हा संघ ऑलआऊट झाला होता. पण असे का झाले? आठ विकेट पडतच पाकिस्तानचा संघ ऑलआऊट कसा झाला?

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीच्या नाबाद 122 आणि केएल राहुलच्या नाबाद 111 धावांच्या जोरावर भारताने संपूर्ण 50 षटके खेळून दोन गड्यांच्या मोबदल्यात 356 धावा केल्या. ही एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्धची भारताची संयुक्त सर्वोच्च धावसंख्या होती. यापूर्वी 2005 मध्ये विशाखापट्टणममध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध नऊ विकेट गमावून 356 धावा केल्या होत्या.

आता जुन्या प्रश्नाकडे परत येत आहोत की आठ विकेट्स पडतच पाकिस्तानचा संघ ऑलआऊट कसा झाला? याचे कारण त्याच्या दोन खेळाडूंना झालेली दुखापत. पाकिस्तानचे दोन वेगवान गोलंदाज हरिस रौफ आणि नसीम शाह यांना दुखापत झाली आणि त्यामुळे ते फलंदाजीला आले नाहीत, त्यामुळे पाकिस्तानचा संघ आठ गडी गमावून सर्वबाद झाला. राखीव दिवशी सामना सुरू झाला, तेव्हा रौफ या सामन्यात आणखी गोलंदाजी करणार नसल्याची बातमी आली. वास्तविक, त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली होती, त्यामुळे तो गोलंदाजी करू शकला नाही आणि फलंदाजीलाही येऊ शकला नाही. तर नसीम शाह भारताच्या डावाच्या 49 व्या षटकात खांद्याला दुखापत झाल्यामुळे मैदानाबाहेर गेला. याच कारणामुळे तो फलंदाजीला आला नाही. याच कारणामुळे कुलदीपने फहीम अश्रफच्या रूपाने पाकिस्तानची आठवी विकेट घेतली, तेव्हा संपूर्ण संघ ऑलआऊट झाला आणि भारताचा विजय झाला.

या सामन्यात हारिसने पाच षटकात 27 धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. तर नसीमने 9.2 षटकात 53 धावा दिल्या आणि त्यालाही एकही विकेट घेता आली नाही. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, हे दोन्ही गोलंदाज आशिया कपचे उर्वरित सामने खेळू शकणार नाहीत. दोघांनाही फलंदाजीला न पाठवण्याचा निर्णय त्यांच्या दुखापती अधिक खोलवर जाऊ नयेत म्हणून खबरदारीसाठी घेण्यात आला. पुढील महिन्यात एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे आणि अशा स्थितीत पाकिस्तानला आपल्या दोन सर्वोत्तम गोलंदाजांसह कोणताही धोका पत्करायचा नाही. पाकिस्तानने शाहनबाज दहानी आणि जमान खान या दोन वेगवान गोलंदाजांना पाचारण केले आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निवेदनात म्हटले आहे. पीसीबीने सांगितले की, रौफ आणि नसीम हे वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली राहतील.