IND vs PAK : राखीव दिवशीही सामना झाला नाही तर टीम इंडिया येणार अडचणीत, कसा खेळणार अंतिम सामना?


आशिया चषक-2023 मध्ये पावसामुळे खूप त्रास होत आहे. पावसामुळे 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात आला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामना 10 सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु कोलंबोमध्ये खेळला जाणारा सामना देखील पावसाच्या सावलीत होता आणि त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद केली होती. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला आणि नियोजित दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही. आता हा सामना राखीव दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. पण या सामन्यातही खराब हवामान असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची खात्री आहे. हा सामना पावसामुळे राखीव दिवशीही होऊ शकला नाही, तर भारताला अंतिम सामना खेळणे अवघड होऊन तर बसणार नाही ना?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने शानदार सुरुवात केली. भारताने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पाऊस आला आणि परिस्थिती सामना खेळण्यासाठी अयोग्य ठरली, त्यानंतर पंचांनी सामना राखीव दिवसापर्यंत पुढे ढकलला.

राखीव दिवशी सामना रद्द झाला, तर टीम इंडियाचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग काय असेल? अशा परिस्थितीत 12 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि 15 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध होणारे सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकणे टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वाचे असेल. पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. जर टीम इंडियाने श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले, तर त्याचे एकूण पाच गुण होतील. यानंतर टीम इंडिया सहज फायनलमध्ये पोहोचू शकते.

बांगलादेशचा पराभव करून पाकिस्तान आणि श्रीलंकेने प्रत्येकी दोन गुण घेतले आहेत. सध्या हे दोन्ही संघ भारतापेक्षा पुढे आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यास पाकिस्तानलाही एक गुण मिळेल आणि दोन सामन्यांतून तीन गुण होतील. त्यानंतर श्रीलंकेशी खेळावे लागेल आणि श्रीलंकेला हरवले, तर पाच गुण होतील. भारतानेही आपले दोन्ही सामने जिंकल्यास त्याचेही पाच गुण होतील आणि अशा स्थितीत श्रीलंका आणि बांगलादेश अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनल होईल. दोघांनी एकदाही आशिया कपचा अंतिम सामना खेळलेला नाही.

पण श्रीलंकेने पाकिस्तानला हरवले आणि भारताला हरवले तर त्याचे चार गुण होतील. जर पाकिस्तान भारत आणि श्रीलंकेकडून पराभूत झाला, तर भारत आणि श्रीलंका अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात. भारताचे गणित अगदी स्पष्ट आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याला उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही किंमतीला जिंकावे लागतील.

परंतु काही परिस्थितींमध्ये गाडी अडकू शकते. पाकिस्तानने उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक गमावला आणि एक जिंकला तर त्याचे चार गुण होतील. त्याचप्रमाणे श्रीलंकेनेही आपल्या उरलेल्या दोन सामन्यांपैकी एक हरला आणि दुसरा जिंकला तर त्याचेही चार गुण होतील. टीम इंडियाने तीनपैकी दोन सामने जिंकले आणि एक हरला, तर अशा स्थितीत प्रत्येकाचे चार गुण होतील आणि मग प्रकरण नेट रनरेटवर अडकेल. अशा परिस्थितीत ज्याचा रनरेट चांगला असेल तो अंतिम फेरीत जाईल.