IND VS PAK : 10 सप्टेंबरला भारत-पाक सामना वाहून गेला, तरीही लागणार निकाल, आशिया कपमध्ये घेतला मोठा निर्णय


आशिया चषक 2023 च्या सुपर-4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ शकेल का, हा मोठा प्रश्न आहे. वास्तविक हा सामना 10 सप्टेंबर रोजी होणार असून या दिवशी कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर 10 सप्टेंबरला पावसाने या सामन्यात अडथळा आणला, तर हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबरला पूर्ण होईल. सुपर-4 मधील या सामन्यासाठीच राखीव दिवस जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय आशिया कप फायनलसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.

आशिया कपच्या साखळी फेरीतील भारत-पाकिस्तान सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात भारताने फलंदाजी केली होती, मात्र पाकिस्तानच्या फलंदाजीपूर्वीच इतका जोरदार पाऊस पडला की सामनाच रद्द करावा लागला. पल्लेकेलेतील हा सामना रद्द झाल्याने चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. यानंतर टीम इंडियाच्या पुढच्या सामन्यातही पावसाने दणका दिला. कसेबसे टीम इंडियाने नेपाळला हरवून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले. आता सुपर-4 फेरीतील पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवरही पावसाची सावली दिसत आहे. त्यामुळेच आशियाई क्रिकेट परिषदेला राखीव दिवस जाहीर करावा लागला.

बरं, एक प्रश्न आहे की भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असेल, तर इतर संघांचे काय? श्रीलंका आणि बांगलादेशचे संघही सुपर-4 मध्ये पोहोचले आहेत. या संघाना 9 सप्टेंबरला कोलंबोमध्ये सामना खेळायचा आहे आणि या दिवशीही मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांच्या क्रिकेट संघटना हे प्रकरण उचलून धरु शकतात.