पुन्हा मिळणार वर्ल्ड कप 2023 ची तिकिटे, हजारो चाहत्यांचे नशीब खुलणार, जाणून घ्या कोणत्या दिवशी सुरु होणार विक्री?


विश्वचषक 2023 सुरू होण्यास एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. भारतात होणाऱ्या या विश्वचषकासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्यामुळेच तिकीट मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. मोजक्याच लोकांनाच यश मिळाल्यामुळे आयसीसी आणि बीसीसीआयला टीकेला सामोरे जावे लागले होते. चाहत्यांच्या सततच्या तक्रारींनंतर, बीसीसीआयने तिकीट विक्रीची दुसरी फेरी सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये सर्व सामन्यांसाठी एकूण 4 लाख तिकिटे विकली जातील.

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होण्यास उशीर आणि नंतर त्यात बदल झाल्यामुळे तिकिटांची विक्री सुरू होण्यास बराच विलंब झाला. 24 ऑगस्टपासून भारत आणि इतर संघांच्या सामन्यांची मर्यादित तिकिटे वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये विकली जाऊ लागली. मात्र, यावेळी चाहत्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आणि केवळ भारताचे सामनेच नव्हे, तर इतर संघांच्या सामन्यांची तिकिटेही काही मिनिटांतच पूर्णपणे विकली गेली.

तिकिटांची विक्री कमी झाल्यामुळे ‘सोल्ड आउट’ ही सूचना लगेचच पडद्यावर दिसू लागल्याने चाहत्यांमध्ये मोठी निराशा आणि संताप पसरला. हे पाहता आता बीसीसीआयने आणखी 4 लाख तिकिटे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बोर्डाने बुधवार, 6 सप्टेंबर रोजी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की चाहत्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तिकीट विक्रीची दुसरी फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवेगळ्या सामन्यांचे आयोजन करणाऱ्या राज्य संघटनांशी बोलून ही 4 लाख तिकिटे विकण्याचे मान्य करण्यात आल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.

या 4 लाख तिकिटांची विक्री 8 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार असून वर्ल्ड कपच्या वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे. बीसीसीआयने चाहत्यांना असा सल्लाही दिला आहे की, पुन्हा एकदा तिकिटांची मागणी खूप वाढणार आहे आणि त्यामुळे त्यांनी तातडीने तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न करावा. इतकेच नाही तर भारतीय बोर्डाने सांगितले की, यानंतर विक्रीची आणखी एक फेरी होणार आहे, ज्याची माहिती चाहत्यांना लवकरच दिली जाईल.