4500 वर्ष जुन्या या आजारावर नाही कोणताही इलाज, लस न घेतल्यास होतो रुग्णाचा मृत्यू


नुकतेच गाझियाबादमध्ये एका मुलाचा रेबीजने मृत्यू झाला. या मुलाचा काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याने चावा घेतला होता, मात्र ही माहिती त्याने कोणालाही दिली नव्हती. यामुळे, रेबीज प्रतिबंधक लस दिली जाऊ शकली नाही आणि काही दिवसांनंतर रेबीज संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार रेबीज हा 4500 वर्षे जुना आजार आहे, परंतु आजपर्यंत त्यावर कोणताही इलाज नाही. म्हणजेच एखाद्याला रेबीजचा आजार झाला, तर त्या रुग्णावर उपचार करता येत नाहीत. रेबीजचा संसर्ग मेंदूत गेल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. या आजाराची लक्षणे काही महिन्यांनी किंवा वर्षांनंतरही दिसू शकतात. लक्षणे दिसू लागल्यानंतर, रुग्णाची स्थिती बिघडते आणि नंतर मृत्यू होतो.

रेबीज रोगाची 95% प्रकरणे फक्त कुत्रा चावल्यामुळे होतात. अनेक प्रकरणांमध्ये कुत्रा चावल्यानंतर लोक घरगुती उपाय करू लागतात. परंतु या आजाराचे विषाणू कोणत्याही प्रकारच्या घरगुती उपायांनी नष्ट होऊ शकत नाहीत. या आजारापासून बचाव करण्यासाठी केवळ रेबीजविरोधी लस प्रभावी आहे. एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला असेल आणि जखम झाली असेल तर लवकरात लवकर लसीकरण करा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 24 तासांच्या आत लस घेण्याचा प्रयत्न करा. यापेक्षा जास्त विलंब करणे योग्य नाही.

याबाबत तज्ज्ञ सांगतात की, कुत्रा चावल्यावर आधी जखम आहे की नाही हे पाहा. जर जखम नसेल, तर काळजी करण्यासारखे काही नाही. पण जखम असेल, तर आधी धुवावी. या दरम्यान, कोणत्याही घरगुती उपायाच्या आहारी जाऊ नका आणि ताबडतोब डॉक्टरांना भेटा. कुत्रा चावल्यानंतर थोडीशी ओरखडे असलेली जखम झाली, तरी रेबीज प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. कारण रेबीजचा विषाणू कुत्र्याच्या लाळेमध्ये असतो. ही लाळ व्यक्तीच्या त्वचेतून रक्ताच्या संपर्कात आल्यास रेबीजची लागण होण्याचा धोका असतो.

जर एखाद्या पाळीव कुत्र्याला रेबीज विरूद्ध लसीकरण केले गेले नसेल, तर ते मानवांना देखील रेबीज संसर्गास कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नका. पाळीव कुत्रा चावला असेल तरीही लसीकरण जरुर करुन घेणे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही