या ठिकाणी दोन रुपये किलो झाले टोमॅटोचे दर, रस्त्यावर फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ


काही काळापूर्वी टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. आज तेच गगन शेतकऱ्यांवर कोसळताना दिसत आहे. होय, आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहेत. राज्यातील घाऊक बाजारात टोमॅटोचे दर किलोमागे दोन ते तीन रुपयांवर आले आहेत. तर किरकोळ बाजारातील किंमत यापेक्षा 10 पट अधिक आहे. टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना टोमॅटो फेकून द्यावे लागत आहेत. आंध्र प्रदेशातील टोमॅटो शेतक-यांची काय तक्रार आहे तेही जाणून घेऊया.

कर्नूल जिल्ह्यातील पत्तीकोंडा बाजारात एक किलो टोमॅटोची किंमत केवळ 3 किंवा 2 रुपये आहे. 100 किलो टोमॅटोला केवळ 200 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे खरेदीदार खूप कमी असताना बाजारात टोमॅटोचा साठा मोठ्या प्रमाणात येणे. काढणीला आलेल्या पिकाला रास्त भाव मिळत नसल्याने आपले मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

खते, कीटकनाशके यासारख्या इतर खर्चाशिवाय मालवाहतुकीसाठीही पैसे मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. मात्र, वाहतूक खर्च थोडा कमी होईल, या विचाराने काही शेतकरी कापलेले टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या वेबसाईटवर नजर टाकली तर टोमॅटोचा भाव 28.4 रुपये किलो आहे.

जुलै महिन्यात टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ झाली होती. देशात टोमॅटोचा भाव 400 रुपये किलोवर पोहोचला होता. त्यामुळे टोमॅटोच्या दरामुळे जुलै महिन्यात किरकोळ महागाई 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली होती. हा आकडा 7 टक्क्यांहून अधिक वाढला होता. अंदाजानुसार, ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई 6 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते.