नेपाळच्या फलंदाजाने ठोकला मोहम्मद सिराजला खूप लांब षटकार, स्टेडियममधून रस्त्यावर पोहोचला चेंडू


भारत आणि नेपाळ यांच्यात सुरु असलेल्या आशिया चषकाच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याचे कारण म्हणजे या सामन्यावर टीम इंडियाचा सुपर-4मधील प्रवेश अवलंबून आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. दोन्ही संघांना पुन्हा गुण वाटून घ्यावे लागले. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा ठरला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून नेपाळला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. नेपाळ भारताविरुद्ध मजबूत धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळचा सलामीचा फलंदाज कुशल भुर्तेलने सुरुवातीच्या षटकांमध्ये असे काही केले की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

कुशलसह डावाची सुरुवात करण्यासाठी आसिफ शेख उतरला. हे दोन्ही खेळाडू लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले असते, पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी सुरुवातीलाच दोघांचे तीन झेल सोडले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंनी दोन झेल सोडले.

कुशल भारतीय गोलंदाजांवर अधिक वरचढ दिसत होता. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमणाची रणनीती अवलंबली होती. यादरम्यान त्याने मोहम्मद सिराजला असा षटकार मारला की सगळे पाहतच राहिले. सिराज सहावे षटक टाकत होता. सिराजने कुशलला बाऊन्सर टाकला आणि कुशलने लगेच तो बॅटच्या मध्यभागी घेऊन डीप स्क्वेअर लेगवर षटकार मारला. कुशलचा हा षटकार खूप लांब होता की चेंडू मैदानाबाहेर गेला. हा शॉट पाहून सगळेच थक्क झाले. त्याच्या पुढच्या चेंडूवर सिराजने बाउन्सर टाकला आणि हा चेंडू कुशलच्या हेल्मेटजवळून गेला आणि यष्टिरक्षक इशान किशनच्या हातात गेला. हा चेंडू ताशी 147 किलोमीटरचा होता. कुशलने तो खेचण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू बॅटवर येऊ शकला नाही.

भारताने सुरुवातीच्या षटकांमध्ये तीन झेल सोडले आणि नेपाळच्या सलामीच्या जोडीने याचा फायदा घेत संघाला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 65 धावा केल्या. टीम इंडियाचा कर्णधार रोहितने ही जोडी फोडण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि अखेर शार्दुल ठाकूरने त्याला हे यश मिळवून दिले. ठाकूरने कुशलला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.