गेल्या तीन वर्षांत देशभरात हृदयविकाराच्या घटनांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. हृदयविकारामुळे होणारे मृत्यू कमी वयात होत आहेत. कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका येत असल्याची भीती काही लोकांनी व्यक्त केली होती. मात्र, आयसीएमआरने याबाबत संशोधन केले होते. ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका कोरोना लसीमुळे येत असल्याचे नाकारण्यात आले होते. आता कोविडची लस आणि हृदयविकाराचा झटका यांच्यातील संबंधाबाबत एक नवीन अभ्यास समोर आला आहे. या संशोधनात असे म्हटले आहे की, कोरोना लसीमुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली नाही. हे संशोधन पीएलओएस जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हा अभ्यास ऑगस्ट 2021 ते 2022 दरम्यान दिल्लीतील जीबी पंत रुग्णालयात दाखल झालेल्या 1,578 हृदयरुग्णांवर करण्यात आला आहे. यापैकी सुमारे 70 टक्के रुग्णांना कोविडची लस देण्यात आली होती आणि 30 टक्के रुग्णांनी लस घेतली नव्हती.
Covid and heart attack : कोरोना लसीमुळे येतो का हृदयविकाराचा झटका? काय म्हणते नवीन संशोधन ते जाणून घ्या
हे संशोधन करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोविडच्या लसीकरणामुळे रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजार दिसून आलेले नाहीत. रूग्णांचे प्राण वाचविण्यात लसीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गंभीर रुग्णांमध्ये कोविड लसीचा वापर केल्याने कोरोना विषाणूपासून बरेच काही वाचले आहे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात मदत झाली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावलेल्या लोकांमध्ये बहुतांश रुग्ण इतर अनेक आजारांनी त्रस्त होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्या होत्या.
लसीमुळे कमी झाले मृत्यूचे प्रमाण
कोरोना लसीमुळे विषाणूची लागण झालेल्या गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. 50 वर्षांवरील रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे कमी होण्यास मदत झाली आहे आणि त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. लसीमुळे कोणत्याही रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला नाही. कोविडची लस दिल्यानंतर 30 दिवसांत केवळ 2 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मृत्यूचे कारणही लस नव्हते. उलट या रुग्णांच्या हृदयाची धमनी आधीच ब्लॉक झाली होती. यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
आयसीएमआरनेही केले संशोधन
देशातील कोविड महामारी आता संपुष्टात आली आहे आणि 95 टक्क्यांहून अधिक नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. कोविड लस आणि हृदयविकाराचा झटका यांच्यातील संबंधाचाही ICMR ने अभ्यास केला होता. त्याचे निकाल काही दिवसांपूर्वी आले. कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नसल्याचे अभ्यासात समोर आलं आहे.