‘कौतुकास पात्र आहेत इस्रोचे शास्त्रज्ञ’, चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग ही मोठी कामगिरी असल्याचे पाकिस्तानने म्हटले


चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. अवघ्या दोन दिवसांनंतर शेजारी देश पाकिस्ताननेही भारत आणि इस्रोच्या यशावर स्तुतीसुमने उधळली आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोचे कौतुक केले आहे. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही वैज्ञानिकांची मोठी उपलब्धी आहे. यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ कौतुकास पात्र आहेत.

चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाले, त्याच दिवशी इम्रान सरकारमध्ये मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी भारताचे अभिनंदन केले होते. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे ते म्हणाले होते. यादरम्यान, त्यांनी या मोहिमेचा भाग असलेल्या याच्या प्रमुखांसह सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. चांद्रयान-3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून इतिहास रचला.


यासह भारत दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे. दरम्यान हा तोच फवाद चौधरी आहे, ज्याने चांद्रयान-2 च्या अयशस्वी लँडिंगची खिल्ली उडवली होती. मात्र आज भारताच्या यशापुढे त्याला नतमस्तक व्हावे लागले. चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगमुळे केवळ पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जग आनंदी आहे आणि भारत आणि इस्रोला शुभेच्छा पाठवत आहे.

दरम्यान फवाद चौधरी यांनी चांद्रयान-3 चे लँडिंग पाकिस्तानमध्ये लाईव्ह दाखवण्याची मागणी केली होती. पाकिस्तानी माध्यमांनी लाईव्ह दाखवावे, असे ते म्हणाले होते. मानवतेसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतातील लोकांसाठी, वैज्ञानिकांसाठी आणि भारतातील अंतराळ समुदायासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल ते म्हणाले होते की, स्वप्ने असलेली तरुण पिढीच जग बदलू शकते.