50 कोटी जनधन खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपये जमा, सरकारने जाहीर केली ताजी आकडेवारी


प्रधानमंत्री जन धन खात्याला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. 2014 मध्ये सरकारने जन धन खाते योजना सुरू केली. गरिबांना बँकिंग सेवेशी जोडणे हा ज्याचा उद्देश होता. 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारने जनधन खातेधारकांची आकडेवारी जाहीर केली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार पीएमजेडीधारकांचा आकडा 50 कोटींच्या पुढे गेला आहे. यापैकी 56% खाती महिलांच्या नावावर आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याच वेळी, सरकारने सांगितले की 50 कोटींच्या आकड्यापैकी 67 टक्के खाती गावे आणि लहान शहरांमध्ये उघडली गेली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 2.03 लाख कोटी रुपये जमा आहेत, तर या खात्यांमधून सुमारे 34 कोटी रुपे कार्ड विनामूल्य जारी करण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री जन धन खात्यांमध्ये सरासरी रक्कम 4,076 रुपये आहे आणि यापैकी 5.5 कोटी खातेधारकांना थेट लाभ हस्तांतरणाचा (डीबीटी) लाभ मिळत आहे.


पीएमजेडीवाय खातेधारकांना अनेक फायदे मिळतात. या खात्यात तुम्हाला किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. याशिवाय मोफत रुपे डेबिट कार्ड, 2 लाख रुपयांचा अपघाती विमा आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधांचाही यात समावेश आहे.

गेल्या वर्षी राज्यसभेत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लेखी उत्तरात सांगितले की, 30 नोव्हेंबरपर्यंत देशात सुमारे 47.57 कोटी जन धन खाती उघडण्यात आली आहेत, त्यापैकी 38.19 कोटी चालू आहेत, तर 10.79 लाख डुप्लिकेट आहेत. म्हणजेच लाखो खाती चुकीच्या पद्धतीने उघडण्यात आली आहेत. चुकीच्या पद्धतीने एकापेक्षा जास्त खाती उघडणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. अशा स्थितीत ती खाती वेळीच बंद करणे योग्य ठरेल.