इंग्लंडने जाहीर केला विश्वचषक 2023 साठी संघ, 3 मोठे निर्णय घेऊन दिला सर्वांना आश्चर्याचा धक्का


ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता इंग्लंडनेही एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. गतविजेत्या इंग्लंडने विश्वचषकापूर्वी बुधवारी, 16 ऑगस्ट रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आणि तोच संघ विश्वचषकासाठी भारतातही येणार आहे. या संघात तीन महत्त्वाच्या गोष्टी पाहायला मिळाल्या – बेन स्टोक्सचे पुनरागमन, जोफ्रा आर्चरवर धोका पत्करला नाही आणि हॅरी ब्रूकला वगळण्यात आले. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार असून पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा सामना गेल्या विश्वचषकातील उपविजेत्या न्यूझीलंडशी होणार आहे.

2019 वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडचे मुख्य निवडकर्ता ल्यूक राइट यांनी संघाची घोषणा केली. विश्वचषकापूर्वी इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिका खेळायची आहे. निवडकर्ता राईटने सांगितले की विश्वचषकासाठी इंग्लंडचा हा प्रारंभिक संघ आहे. मात्र, येत्या काही दिवसांत इंग्लंड यात बदल करू शकतो. विश्वचषकाच्या नियमांनुसार प्रत्येक मंडळाला 5 सप्टेंबरपर्यंत संघ जाहीर करायचा आहे. यानंतर 27 सप्टेंबरपर्यंत संघात बदल करण्याची मुभाही असेल, मात्र त्यानंतर केवळ दुखापतीच्या बाबतीतच बदल करता येतील.

इंग्लंडच्या विश्वचषक संघात तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यापैकी एक सर्वांना माहीत होती, पण बाकीचे दोन निर्णय आश्चर्यकारक होते. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स अखेर वनडे फॉरमॅटमध्ये परतला आहे. स्टोक्सने गेल्या वर्षीच या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, पण कर्णधार जोस बटलरच्या केलेल्या मनधरणीनंतर तो विश्वचषकासाठी निवृत्तीतून परतला आहे. स्टोक्सनेच गेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.

इंग्लंडचा विश्वचषक संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरान, लियाम लिव्हिंग्स्टन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.