15 ऑगस्टला पंतप्रधान आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का करतात ध्वजारोहण?


देशात 76व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू झाली असून, 15 ऑगस्टला पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत. स्वातंत्र्याचा जल्लोष केला जाईल आणि ज्यांनी देशाला गुलामगिरीतून मुक्त केले त्यांचे स्मरण स्वातंत्र्याच्या गाण्यांमधून केले जाईल. देशात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहणाची जबाबदारी पार पाडतात, असे का होते याचा विचार कधी केला आहे का? असे का केले जाते आणि दोन्ही राष्ट्रीय सणांना ध्वजारोहण करण्याचा नियम का वेगळा आहे, हे समजून घेऊ.

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण यातील फरक
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, कारण 1950 मध्ये या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली होती, तर 15 ऑगस्ट हा गुलामगिरीच्या साखळीतून मुक्त होण्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी ध्वज खाली बांधला जातो आणि दोरीने वर घेतला जातो, त्यानंतर तो फडकवला जातो. हे 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्याच्या सन्मानार्थ केले जाते, तर प्रजासत्ताक दिनी ध्वज वर बांधला जातो आणि फडकवला जातो.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानच का करतात ध्वजारोहण?
स्वातंत्र्यदिनी फक्त देशाचे पंतप्रधानच ध्वजारोहण करतात, खरे तर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 पासून साजरा केला जातो, त्यावेळी देशात संविधान लागू नव्हते. तसेच राष्ट्रपतींनी तोपर्यंत पदभार स्वीकारला नव्हता. त्यामुळेच प्रथमच तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. संविधानाच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, म्हणूनच राष्ट्रपती या दिवशी ध्वजारोहण करतात, कारण ते देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत.

वेगवेगळ्या असतात जागा
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण होते, येथून पंतप्रधान देशवासीयांना संबोधित करतात, तर प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर कार्यक्रम आयोजित केला जातो. येथे भव्य परेड देखील होते.