ज्याला उपकर्णधार बनवले, त्यालाच पाकिस्तानने संघातून टाकले काढून, 9 ची सरासरी असलेल्या फलंदाजाची आशिया चषकासाठी निवड


आशिया कप 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हकने पाकिस्तान संघाची घोषणा केली आणि त्याने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली एकूण 17 खेळाडूंना या संघात स्थान दिले. मोठी गोष्ट म्हणजे ज्या खेळाडूला न्यूझीलंड वनडे मालिकेसाठी पाकिस्तान संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले होते, त्याच खेळाडूला आशिया कपसाठी संघातून वगळण्यात आले आहे.

डावखुरा फलंदाज शान मसूद आशिया कपमध्ये खेळू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. इंझमाम-उल-हकने सांगितले की, शान मसूदची कामगिरी चांगली नसल्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो खराब कामगिरी करत होता. मात्र, मसूदच्या जागी इंझमाम-उल-हकने संधी दिलेल्या खेळाडूची कामगिरी आणखी वाईट आहे.

मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हक यांच्याशिवाय तिसरा सलामीवीर अब्दुल्ला शफीकची पाकिस्तानच्या संघात निवड करण्यात आली आहे. अब्दुल्ला शफीक पाकिस्तानसाठी उत्कृष्ट कसोटी क्रिकेट खेळत आहे, पण एकदिवसीय क्रिकेटसाठी त्याची निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये या खेळाडूने आतापर्यंत सर्वांना निराश केले आहे.

अब्दुल्ला शफीकचे एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय आकडे खूपच खराब आहेत. वनडेमध्ये या खेळाडूने 3 सामन्यात 9.33 च्या सरासरीने केवळ 28 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये शफिकला 6 सामन्यात फक्त 12.8 च्या सरासरीने 64 धावा करता आल्या. इतकी खराब आकडेवारी असूनही शफीकला आशिया कपसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघात स्थान देण्यात आले आहे.

पाकिस्तानने या खेळाडूला एकदिवसीय संघाचा उपकर्णधार बनवले होते, मात्र शान ही जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकला नाही. 9 सामन्यांनंतरच त्याने निवडकर्त्यांचा विश्वास गमावला. शानने आतापर्यंत 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ 18.11 च्या सरासरीने 163 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट 70 पेक्षा कमी आहे.

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, उसामा मीर, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद हरीस, फहीम अश्रफ, इमाम-उल-हक तय्यब ताहिर, हारिस रौफ, फखर जमान, मोहम्मद वसीम, आगा सलमान, शादाब खान, नसीम शाह, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज आणि शाहीन शाह आफ्रिदी.